नामाचिये बळे, पार केला दिवेघाट

By Admin | Updated: July 2, 2016 12:41 IST2016-07-02T02:22:07+5:302016-07-02T12:41:52+5:30

अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी नागमोडी वळणाचा ४ किलोमीटरचा दिवे घाटाचा अवघड टप्पा लीलया पार केला.

Naimachiye Force, crossed the Diveghat | नामाचिये बळे, पार केला दिवेघाट

नामाचिये बळे, पार केला दिवेघाट


सासवड : ज्ञानोबा-माऊलीच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी नागमोडी वळणाचा ४ किलोमीटरचा दिवे घाटाचा अवघड टप्पा लीलया पार केला. ऊन-पावसाच्या खेळात ‘नामाचिये बळे, पार केला दिवे घाट’ म्हणत सोहळा सासवडनगरीत विसावला.
आळंदीहून निघालेल्या पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता. पुणेकरांचा पाहुणचार आणि दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेले वारकरी सकाळी सहा वाजताच पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. हडपसर गाडीतळावर सकाळी नऊ वाजता माऊलींची पालखी पोहोचली. सकाळी अकरा वाजता तुकाराममहाराजांची पालखी पोहोचली. येथंपर्यंत एकाच मार्गावरून प्रवास करीत पंढरीचा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवत दोन्हीही पालख्या वेगवेगळ्या दिशांनी निघाल्या. हडपसरहून दिवेघाटात पालखी एक वाजण्याच्या सुमारास पोहोचली. हजारो भक्तांनी नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुषवृष्टी करून माऊलींचे स्वागत करण्यात आले. माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडीबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांनीही रथ ओढला. दुपारी पाच वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडीतील विसाव्याच्या ठिकाणी मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. झेंडेवाडीनंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी येथे स्वागत झाले. सासवडच्या तळावर सायंकाळी सात वाजता सोहळा पोहोचला. शुक्रवार आणि शनिवारी सासवडनगरीत मुक्कामानंतर रविवारी सकाळी पालखी सोहळ्याचे जेजुरीला प्रस्थान होणार आहे.
>लोणी काळभोर : माऊली माऊलीचा जयघोष, आसमंतांत घुमणारा टाळ-मृदंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठलनामांत दंग झालेली व भगवी पताका खांद्यावर घेऊन भक्तिभावाने ओथंबलेल्या अभंगाच्या ओळी गात सावळ्या विठुरायाच्या भेटीस आतुरलेली लाखो वैष्णवांची मांदियाळी पुण्यातील नागरिकांचा दोन दिवसांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन जगद्गुरू संतशिरोमणी श्री तुकाराममहाराज पालखी सोहळा जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये पोहोचला.

Web Title: Naimachiye Force, crossed the Diveghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.