अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते -नागनाथ कोत्तापल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:44 IST2018-05-28T03:44:50+5:302018-05-28T03:44:50+5:30
अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात.

अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते -नागनाथ कोत्तापल्ले
पुणे - अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना दररोज नानाविध प्रकारची माणसे, वृत्ती, प्रवृत्ती भेटत असतात. त्यामुळे प्रशासकीय नोकरीच्या निमित्ताने अनुभवाचे एक मोठे दालनच त्यांच्यापुढे उभे ठाकलेले असते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा काव्यप्रतिभा पुरस्कार उपजिल्हाधिकारी आणि शरद पवार यांचे स्वीय सहायक कवी सतीश राऊत यांना देण्यात आला. त्या वेळी कोत्तापल्ले बोलत होते. या वेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अॅड. प्रमोद आडकर आणि श्यामची आई फाऊंडेशनचे भारत देसडला उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, ‘मराठी साहित्यास जागतिक पातळीवर ओळख मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. परंतु, मराठी साहित्यिकांचे अनुभवविश्व मर्यादित असल्याने ते वैश्विक अनुभवाशी नाळ जोडू शकत नाही. त्या तुलनेत कामाच्या स्वरूपामुळे प्रशासकीय अधिकाºयाचे अनुभवविश्व व्यापक असल्याने मराठी साहित्यात तो मोलाची भर टाकू शकतो.’
अॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रशासनात असल्याने हाताळावे लागणारे शेतीचे तंटे, अनैतिक संबंधांमुळे निर्माण होणारे प्रश्न, जाती-पातीची भांडणे, दुष्काळ, छावण्या, निवडणुकीचे प्रसंग हेच माझ्या कवितेचे विषय होते. प्रेमकविता तुलनेने कमी लिहिल्या. माझ्या वरिष्ठ अधिकाºयांनी मला प्रोत्साहित केले. सरकारी अधिकाºयांमध्ये संवेदनशीलता नसते, हा समज काही अंशी खोडून काढण्यात यशस्वी झालो, याचे समाधान काव्यनिर्मितीमुळे मिळाले. - सतीश राऊत