जाळपोळ प्रकरणामागील गूढ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2015 03:47 IST2015-07-01T03:47:24+5:302015-07-01T03:47:24+5:30
सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळीचा छडा २४ तासांत लावू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्यानंतर २४ तास उलटले

जाळपोळ प्रकरणामागील गूढ वाढले
पुणे : सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळीचा छडा २४ तासांत लावू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्यानंतर २४ तास उलटले असून, या प्रकरणातील गूढ वाढतच चालले आहे.
पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना ‘हे कृत्य माथेफिरूचे वाटत नाही; तो पूर्वनियोजित कट असावा,’ असे वक्तव्य केले असून, आरोपीचा मागमूस नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जाळपोळीचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. जाळपोळ प्रकरण झाल्यानंतरच्या सायंकाळी याच भागात झालेल्या खून प्रकरणातील माथेफिरू आरोपीचे साम्य सीसी टीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या संशयिताशी असावे, या दाट निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत, असे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सोमवारी सांगितले होते. पाठक यांच्या खुलाशामुळे कालचा निष्कर्ष चुकीचा असल्याचे दिसून आले आहे.
ठेकेदारीच्या कामातील पैशांच्या वादावरून हा खून झाला होता. विनोद जमदाडे याचे आणि सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयितांमध्ये बरेच साम्य आहे. त्या संशयिताने जीन्स पंट आणि टी शर्ट परिधान केलेला आहे, जमदाडे याच्या अंगावर तसेच कपडे असून तो सतत दारूच्या नशेत असतो.
त्याच्याकडे चौकशी सुरू असून त्यानेच हा प्रकार केला असावा, अशा निष्कर्षापर्यंत आम्ही ९९ टक्के
आलो आहोत, असे रामानंद यांनी नमूद केले होते.
पाठक यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट होत असून, कांबळे यांचे २४ तासांत आरोपीला पकडू, हे आश्वासनही
विरले आहे. सामान्य नागरिकांत
मात्र या प्रकारामुळे संताप वाढीस लागला आहे.
(प्रतिनिधी)
सिंहगड रस्त्यावरच्या डॉमिनोज पिझ्झा या हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलींना व परिसरातील सनसिटी रस्त्यावरच्या निर्मल टाऊनशिपमधील सूर्यनगरी, स्वामी नारायण, अवधूत, अक्षय ग्लोरी या सोसायट्यांमधील दुचाकी व चारचाकी वाहनांना एकापाठोपाठ आग लावून समाजकंटक पसार झाला. रविवारी पहाटे तीन ते साडेचारदरम्यान एक ते दीड किलोमीटरच्या पट्ट्यात झालेल्या या भीषण दुर्घटनेत, आगीच्या ५ घटनांत ८४ दुचाकी व ६ चारचाकी वाहने खाक झाली.