स्टेशन-इचलकरंजी बसचे गूढ
By Admin | Updated: January 6, 2015 00:09 IST2015-01-06T00:09:29+5:302015-01-06T00:09:29+5:30
पुणे स्टेशन-इचलकरंजी ही एसटी बस सकाळी ११.३० वाजता सुटते. स्वारगेटवरून ही बस पुढे जाणार असते.
स्टेशन-इचलकरंजी बसचे गूढ
पुणे : पुणे स्टेशन-इचलकरंजी ही एसटी बस सकाळी ११.३० वाजता सुटते. स्वारगेटवरून ही बस पुढे जाणार असते. हे अंतर केवळ १५ मिनिटांचे. मात्र, दुपारी दोन वाजले तरी बस स्वारगेटला आली नाही. याबाबत आगार व्यवस्थापक, इतर अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेही याबाबत अंधारात. मग सुरू होतो बसचा शोध. फोनाफोनी होते. पण रात्री आठ वाजेपर्यंत स्वारगेट आगार व्यवस्थापक व एसटीच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांना याची कसलीच माहिती मिळाली नाही. बस कुठे बंद पडली, चालकाने पळवून नेली की हरवली, याची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
इचलकरंजीला जाण्यासाठी पुणे एसटी स्थानकातून सकाळी ९ व ११.३० वाजता तर दुपारी १.४५ वाजता अशा तीनच बस उपलब्ध आहेत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ११.३० वाजता काही प्रवासी घेऊन ही बस पुणे स्थानकातून निघते. ही बस स्वारगेट बसस्थानकात येऊन पुढे इचलकरंजीला रवाना होणे अपेक्षित होते. त्यासाठी काही प्रवासी बसस्थानकात वाट पाहत थांबले होते. ही बस पुणे स्थानकातून १५ ते २० मिनिटांत स्वारगेटला पोहोचते. मात्र, सोमवारी १ तास उलटून गेला तरी ही बस आलीच नाही. प्रवासी सातत्याने आगारामध्ये बसविषयी चौकशी करीत होते. बस ५ मिनिटांत येईल, १० मिनिटांत येईल, असे सांगण्यात येत होते; पण बस स्वारगेटला फिरकलीच नाही. शेवटी बसची वाट पाहून प्रवाशांनी इतर बसने जाणे पसंत केले.
याबाबत स्वारगेट आगार व्यवस्थापक, तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता रात्री आठ वाजेपर्यंत तेही याबाबत अनभिज्ञ होते. आगाराकडे चालक किंवा वाहकाचा मोबाईल क्रमांक नसल्याने इचलकरंजी स्थानकाशी संपर्क केला जात होता. मात्र, तरीही अधिकाऱ्यांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रक कार्यालय, आगार व्यवस्थापक, इतर संबंधित कर्मचारी यांच्यात कुठलाही समन्वय नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले. उशिरापर्यंत बस इचलकरंजीला पोहोचली की नाही, याची माहिती अधिकारी देऊ शकले नाहीत. दरम्यान, इचलकरंजी बसस्थानकावर लोकमत प्रतिनिधीने दूरध्वनीवरून याबाबत चौकशी केली असता सायंकाळी ६.१५ वाजता बस पोहोचली होती. ही बस स्वारगेट बसस्थानकात न आल्याने हा गोंधळ झाल्याचेही सांगण्यात आले.
प्रवाशांना धरले वेठीस
४एसटी बस वेळेवर न आल्याने प्रवाशांकडून बस नियंत्रण कक्षाशी सातत्याने संपर्क साधला जात होता. मात्र प्रवाशांना बस १० मिनिटांत येईल, असे सांगितले जात होते. असे दोन तास लोटले तरी प्रवाशांना खरे कारण न सांगता वेठीस धरण्यात आले.
४पुणे स्थानकातून बस ११.३० वाजताच सुटल्याचे सांगितले जात होते. पण बस स्वारगेटला न आल्याने प्रवाशांचे हाल झाले. याबाबत नियंत्रण कक्षाला कसलीच कल्पना नसल्याचेही जाणवले.