मुठेच्या ब्ल्यू लाइनबाबत महापालिका अद्यापही संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:59 IST2017-07-27T06:59:12+5:302017-07-27T06:59:16+5:30
जलसंपदा विभागाने निश्चित केलेली मुठा नदीतील ब्ल्यू लाइन, रेड लाइन व महापालिकेच्या आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेले आरेखन यामध्ये फरक असल्याचे समोर आले आहे

मुठेच्या ब्ल्यू लाइनबाबत महापालिका अद्यापही संभ्रमात
पुणे : जलसंपदा विभागाने निश्चित केलेली मुठा नदीतील ब्ल्यू लाइन, रेड लाइन व महापालिकेच्या आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेले आरेखन यामध्ये फरक असल्याचे समोर आले आहे. जलसंपदा विभागाचे अक्षांश व रेखांश यामध्ये देखील बदल असल्याने सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुठा नदीच्या ब्ल्यू लाइनबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात महापालिकेकडूनच थेट ब्ल्यू लाइनमध्येच बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आल्याने सध्या ब्ल्यू लाइन वादाचा विषय ठरली आहे.
शासनाच्या १९८९च्या अध्यादेशानुसार सर्व नद्यांच्या ब्ल्यू लाइन व रेड लाइन रेषा निश्चित करण्यात आल्या. यामध्ये सलग २५ वर्षांमध्ये येणाºया पुरातील सर्वांत मोठा पूर लक्षात घेऊन नद्यांची ही ब्ल्यू लाइन रेषा निश्चित केली जाते. मागील शंभर वर्षांतील सर्वांत मोठ्या पुराचं पाणी जात तिथे रेड लाइन निश्चित केली जाते. शासनाच्या आदेशानंतर पुण्यात जलसंपदा विभागाच्या वतीने सन २०११ मध्ये या निकषानुसार मुठा आणि मुळा नदीचे ब्ल्यू व रेड लाइन निश्चित करणारे नकाशे जाहीर केले. परंतु यामुळे नक्की ब्ल्यू लाइनची हद्द निश्चित होत नव्हती. त्यानंतर सन २०१५ मध्ये या विभागाने नदीच्या दोन्ही काठावर ३०-३० मीटरच्या अक्षांश व रेखांशनुसार ब्ल्यू व रेड लाइन निश्चित केली. त्यानुसार प्रामुख्याने मुठा नदीची ब्ल्यू लाइन गुगल मॅपवर टाकण्यात आली. परंतु त्यानंतर देखील महापालिकेच्या वतीने या ब्ल्यू लाइनमध्ये काही बांधकामांना परवानगी देण्यात आली. त्यात महापालिकेचा नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये देखील जलसंपदा विभागाने निश्चित केलेल्या ब्ल्यू लाइनपेक्षा वेगळी आरेखन करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या शहरातून वाहणाºया मुठा-मुळा नदीच्या ब्ल्यू लाइनबाबत सर्वच पातळीवर संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या तरी मुठा नदीची ब्ल्यू लाइन ही कागदावरच असल्याचे लोकमतच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले. नदीच्या ब्ल्यू लाइनमध्ये कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम तर सोडाच साधा राडारोडा टाकण्यासही बंदी असताना पुणे शहरातून जाणाºया मुठा नदीला जागोजागी अतिक्रमणाचा विळखा बसल्याचे लोकमतच्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. नदीच्या काठावर थेट ब्ल्यू लाइनमध्ये सर्रास स्मशानभूमी, संरक्षण भिंती, निवासी इमारती, रस्ते, चौपाट्या, मंगल कार्यालयांचे बांधकाम आणि राडारोडा टाकून नदीचे पात्र अरुंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी थेट निवासी वास्तू, हॉस्पिटल्स यांची बांधकामं नदीपात्रातच करण्यात आली आहे. त्यात पालिकेनेच ब्ल्यू लाइनमध्ये बांधलेले रस्ते सध्या वादाचा विषय ठरला आहे. याशिवाय
सांडपाणी वाहिन्यांच्या नावाखाली महापालिकेकडूनच या ब्ल्यू लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपाची स्टक्चर उभारली आहेत. मोठ्या प्रमाणावर टाकलेल्या राडारोड्यामुळे पात्र अरुंद झाले आहे.
शासनाच्या नियमानुसार नदीपासून विशिष्ट अंतरावर ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करणे बंधनकारक आहे. पण पुण्यामध्ये अशा स्वरूपाचे ‘डिमार्केशनच’ करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती अधिकृत सूत्रांनी लोकमतला दिली. यामुळे सध्या ब्ल्यू लाइन, नो डेव्हलपमेंट झोन याचा अर्थ प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार काढत असून, सर्रास सर्व नियमांचे उल्लंघन करत आहेत.
ब्ल्यू लाइनचे डिमार्केशन नियमानुसारच
शासनाच्या आदेशानंतर जलसंपदा विभागाच्या वतीने मुठा नदीची ब्ल्यू व रेड लाइन निश्चित केली आहे. यामध्ये सन २०११ मध्ये ब्ल्यू लाइनचे नकाशे निश्चित केले. त्यानंतर प्रत्यक्ष नदीकाठावर दोन्ही बाजूने ३०-३० मीटर अंतरामध्ये अक्षांश व रेखांश निश्चित केले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने तयार केलेली ब्ल्यू लाइनचे डिमार्केशन हे व्यवस्थितीतच व नियमानुसार करण्यात आले आहे.
- पा. भि. शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला धरण