‘मुश्रीफांना कोणतीही ऑफर नाही, नाटकं बंद करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST2021-09-21T04:12:35+5:302021-09-21T04:12:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘चंद्रकांत पाटील यांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती’, असा दावा महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री आणि ...

‘मुश्रीफांना कोणतीही ऑफर नाही, नाटकं बंद करा’
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘चंद्रकांत पाटील यांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती’, असा दावा महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी नुकताच केला होता. मुश्रीफ यांचा हा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खोडून काढताना सांगितले की, मुश्रीफांना मी अशी कोणतीही ऑफर दिली नव्हती. त्यांनी नाटकं करणे बंद करावे.’
सोमवारी (दि. २०) पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरीटवर नाकारतात. कुणालाही त्रास देण्याची आमची संस्कृती नाही. पॅॅनिक होऊन काहीही होत नसते. कारवाई झाल्याने आणि घोटाळे बाहेर पडू लागल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरू आहे. तो त्यांनी बंद करावा आणि कायद्याची लढाई कायद्याने लढावी.’
‘माझं अंबाबाईला साकडं आहे की मुश्रीफ बरे झाले पाहिजेत. त्यांनी पॅनिक व्हायला नको. मुश्रीफांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. माझ्या विरुद्ध ते अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली; पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे आहे,’ असा चिमटाही पाटील यांनी काढला. ‘चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला. हे कोणामुळे झाले तर मुश्रीफांमुळे. म्हणून त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मी त्यांना ठणकावून सांगितलं, ‘पवार एके पवार,’ असा दावा मुश्रीफ यांनी केला.
चौकट
‘असले शंभर पवार फडणवीसांच्या खिशात’
‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात. फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका. अजित पवारांसोबत शपथ घेणे ही ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ होती’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’च नव्हे तर च्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर काढणार आहे. येत्या दोन दिवसात कॉंग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असा इशारा त्यांनी दिला.
चौकट
उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो..
‘अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यातून वेगवेगळी माहिती देत ते मार्ग बदलू लागले आहेत,’ असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृहखाते देऊ नका.