निमोणे परिसरात मुरूम चोरी, शासनाचे दूर्लक्ष
By Admin | Updated: May 7, 2014 04:24 IST2014-05-06T18:37:33+5:302014-05-07T04:24:05+5:30
निमोणे परिसरातील शासकीय गायरान जागेवरील मुरूम चोरी मोठ्या प्रमाणावर चालू असून, महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गावालगत मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत.

निमोणे परिसरात मुरूम चोरी, शासनाचे दूर्लक्ष
निमोणे : निमोणे (ता. शिरूर) परिसरातील शासकीय गायरान जागेवरील मुरूम चोरी मोठ्या प्रमाणावर चालू असून, महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गावालगत मोठमोठे खड्डे तयार झाले असून, या मुरूम चोरांवर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
निमोणे (ता. शिरूर) या गावच्या लगत भरपूर मोकळी शासकीय जागा आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणावर छोट्या-मोठ्या स्वरूपाचा मुरूम आहे. मात्र, स्थानिक महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक दिवसांपासून या भागात कोणत्याही शासकीय परवानगी आणि रॉयल्टीशिवाय मुरूम उपसा जोरात आहे. जेसीबी मशिन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून एकाच रात्रीत हजारो ब्रास मुरूम गायब केला जातो. ही मुरूमचोरी राजरोसपणे चालू असताना संबंधितांना कोणीही अटकाव करत नसल्याने त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. या मुरूम उपशांमुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे काही ठिकाणी, तर तीस फुटांपर्यंत खोल गेले आहेत. या उपशांमुळे लगत असणार्या प्राचीन लिंबाच्या वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले असून, वादळात हे वृक्ष केव्हाही उन्मळून पडू शकतात.
ही मुरूमचोरी विशेषत: रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे जेसीबी यंत्राच्या आवाजाने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवतो. मात्र, या मुरूमचोरांच्या आणि जेसीबीवाल्यांच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक निमूटपणे हा प्रकार सहन करतात. त्यामुळे या मुरूमचोरांची मुजोरी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या बाबीला वेळीच पायबंद घालावा, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.
या संदर्भात गावचे सरपंच विजयराव भोस यांच्याशी संपर्क साधला असताना अशा गोष्टी निदर्शनास आल्यास तत्काळ त्यावर पायबंद घातला जाईल, तर मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.