पुणे : एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरुन झालेल्या वादात एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खुन केल्याची घटना हडपसरमध्ये घडली.
अनिकेत शिवाजी घायतडक (वय १९, रा. मांजरी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शुभम याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रकाश घाडगे (वय २२, रा़ हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़
अनिकेत आणि शुभम हे एकाच परिसरात राहणारे आहेत. अनिकेत याच्यावर यापूर्वी मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. अनिकेत आणि शुभम यांच्यात पूवीर्पासून वादविवाद व कुरबुरी सुरु होत्या. प्रकाश घाडगे, त्यांचा मित्र व अनिकेत घायतडक हे तिघे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेवाळवाडी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर शुभम याच्याकडून पैसे घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन त्याने अनिकेत याला ढकलून देऊन खाली पाडले. त्याच्या इतर ४ साथीदारांनी हातातील कोयता व बांबुने अनिकेत याच्या तोंडावर, डोक्यावर, शरिरावर वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा खुन केला.
या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.