तडीपार गुन्हेगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:56+5:302021-07-14T04:13:56+5:30
राहुल ऊर्फ पप्पू कल्याण वाडेकर (वय २८, रा. राजगुरुनगर, तडीपारीनंतर वाजेवाडी, ता. शिरूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ...

तडीपार गुन्हेगाराचा खून
राहुल ऊर्फ पप्पू कल्याण वाडेकर (वय २८, रा. राजगुरुनगर, तडीपारीनंतर वाजेवाडी, ता. शिरूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मिलिंद विठ्ठल जगदाळे, बंटी विठ्ठल जगदाळे, मयूर विठ्ठल जगदाळे रा. सातकरस्थळ पूर्व (ता. खेड), सचिन शांताराम पाटणे, प्रवीण ऊर्फ मारुती थिगळे रा. थिगळस्थळ (ता. खेड), तौसिफ शेख रा. दोंदे (ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेली माहिती अशी की, पप्पू वाडेकर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतून सहा महिने तडीपार करण्यात आले होते. तो शिरूर तालुक्यातील वाजेवाडी या ठिकाणी नातेवाईकांकडे राहत होता. पप्पू वाडेकर आणि सचिन पाटणे यांच्यामध्ये दोन वर्षांपूर्वी पैशाच्या व्यवहारावरून भांडणे झाली होती. त्याच कारणावरून मिलिंद जगदाळे व त्याचे दोन भाऊ मयूर जगदाळे, बंटी जगदाळे यांच्याबरोबर वाडेकर याचे वैमनस्य होते. त्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
रविवारी (दि. ११) रात्री त्याच्या मुलीला भेटण्यास राजगुरूनगर येथे आला होता. रात्री बाराच्या सुमारास तो व त्याचा मित्र कनेरसर परतत असताना चव्हाणमळा येथे लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी त्याच्या पाळतीवर असणाऱ्या मिलिंद विठ्ठल जगदाळे, बंटी विठ्ठल जगदाळे, मयूर विठ्ठल जगदाळे, सचिन शांताराम पाटणे, प्रवीण थिगळे यांनी वाडेकरला गाठले. त्याच्यावर पिस्तुलातून फायरिंग केले. वाडेकरने ते चुकवीत आडोशाला अंधारात पळ काढला. मात्र सहाही जणांनी त्याचा पाठलाग करत एका शेतात गाठून त्याच्या डोक्यात, तोंडावर दगड टाकून धारदार शस्त्राने मारले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.
या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी भेट दिली. आरोपींना पकडण्यासाठी खेड पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधपथके रवाना केली आहेत.
--
चौकट
पप्पू वाडेकरवरील गुन्हे असे
-
२०११ मध्ये राजगुरुनगरचे माजी उपसरपंच सचिन ऊर्फ पपा भंडलकर यांचा केदारेश्वर मंदिर परिसरात खून करण्यात मुख्य सूत्रधार.
याच वर्षात जबरी मारहाण केल्याचा गुन्हा नोंद
२०१८ मध्ये मारहाण केल्याचा दोन गुन्ह्यात समावेश.
- २०१९ मध्ये हॉटेलमध्ये दरोडा व खुनी हल्ला व इतर गंभीर गुन्ह्यात सहभागी. --
चौकट
सकाळी आठ वाजता खून निष्पन्न झाला. पोलिसांनी मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणला. दुपारपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र गोळी लागल्यामुळे पप्पू वाडेकर याचे शवविच्छेदन करायला डॉक्टरांनी नकार दिला. अखेर नातेवाईकांनी दुपारी पुण्यातील ससून रुग्णालय गाठले. शवविच्छेदनाबाबत चांडोली ग्रामीण रुग्णालयात ही अडचण नेहमीच अनुभवायला मिळते, असे पोलीस म्हणाले.
--
१२राजगुरुनगर खून १
फोटो १२ राजगुरुनगर पप्पू वाडेकर
फोटो ओळ: जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते घटनास्थळी पाहणी करताना.
फोटो: मृत / पप्पू वाडेकर