मेव्हणीच्या खुनाचे गुढ स्वारगेट पोलिसांनी उकलले

By Admin | Updated: February 14, 2017 22:16 IST2017-02-14T22:16:33+5:302017-02-14T22:16:33+5:30

मेव्हण्याने केलेल्या दुस-या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणा-या तसेच वारंवार ब्लॅकमेल करणा-या

The murder of the mother-in-law was excavated by Swargate police | मेव्हणीच्या खुनाचे गुढ स्वारगेट पोलिसांनी उकलले

मेव्हणीच्या खुनाचे गुढ स्वारगेट पोलिसांनी उकलले

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 -  मेव्हण्याने केलेल्या दुस-या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणा-या तसेच वारंवार ब्लॅकमेल करणा-या मेव्हणीचा थंड डोक्याने केलेला खून स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून केल्यावर चाकणला पुरलेला मृतदेह परत उकरुन काढत बार्शी तालुक्यातील एका शेतामध्ये जाळण्यात आला. जळालेल्या मृतदेहाची शिल्लक राहिलेली  हाडे आणि कवटीसुद्धा आरोपींनी दगडाने ठेचून भुगा करुन नष्ट केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांनी दिली. 
अश्विनी शिवकुमार परदेशी (वय 25, रा. 429/30, डायस प्लॉट, गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी गोविंद ताकभाते (रा. नेहरुनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी ही 5 जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत तिची आई राजश्री यांनी फिर्याद दिली होती. अश्विनीचे नदीम नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पोलिसांनी ती त्याच्यासोबत पळून गेल्याचा संशय व्यक्त करीत त्याच्याकडे चौकशी केली. परंतु, अश्विनीच्या संमतीनेच त्याचे दोन महिन्यांपूर्वी त्याच्याच धर्मातील एका तरुणीसोबत आई-वडिलांनी लग्न लावून दिल्याचे समोर आले. तो वारंवार चौकशीला बोलावल्यावर पोलिसांसमोर येत होता. पोलिसांनी खंडणी किंवा अपहरणाची शक्यताही पडताळून पाहिली. मात्र, त्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. 
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांना वेगळीच शंका आली. त्यांनी अश्विनीची बहीण स्वाती हिच्याकडे महिला उपनिरीक्षक क्षीरसागर यांच्या मदतीने चौकशी सुरू केली.  स्वाती हिचे गोविंदसोबत आळंदीमध्ये लग्न झाले होते. गोविंदच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तो सहा महिन्यांमधून कधीतरी येऊन स्वातीजवळ रहायचा. त्यांना दोन मुले आहेत. अश्विनीला गोविंदने दुसरे लग्न केल्याचा संशय होता. वास्तविक त्याने दुसरे लग्न केल्याचे अश्विनीला समजले होते. त्यामुळे ती स्वातीची दोन्ही मुले घेऊन गोविंदच्या आईकडे सोडण्याची धमकी देत होती. त्यामुळे गोविंदने माऊली नावाच्या मित्राच्या मदतीने अश्विनीला सारसबागेजवळ भेटायला बोलावून तिला मोटारीत बसवले. तिच्या डोक्यामध्ये लाकडी दांडक्याने मारुन खून केल्यावर तळेगाव - चाकण रस्त्याच्या कडेला तिचा मृतदेह पुरला. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून भटके कुत्रे मारुन तेथे टाकून देण्यात आले. परंतु पोलिसांना मृतदेह सापडेल या भितीने त्यांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढून बार्शी तालुक्यातील खांडवी गावातील एका शेतामध्ये जाळला. त्यानंतर उरलेली हाडे व कवटी दगडाने ठेचून भुगा केला. ही कारवाई उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  
आरोपी गोविंद याने पोलीस तसेच अश्विनीच्या नातेवाईकांची दिशाभूल करण्याकरिता तिचा प्रियकर नदीम याला फोन करुन ती मुंबईतील डान्सबारमध्ये काम करीत असल्याचे कळवले. तसेच पोलीस ठाण्यात मिसींग दाखल केल्यानंतर पोलिसांना दुस-या व्यक्तीमार्फत फोन करुन तीने लग्न केले असून ती सुखरुप असल्याची खोटी माहिती दिली होती. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी थंड डोक्याने मिसींगची तक्रार द्यायला पोलीस चौकीमध्ये आलेला होता.

Web Title: The murder of the mother-in-law was excavated by Swargate police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.