खून प्रकरणी पित्यासह तिघांना जन्मठेप
By Admin | Updated: January 17, 2015 23:35 IST2015-01-17T23:35:20+5:302015-01-17T23:35:20+5:30
तिघा जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडिलांसह दोन मुलांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

खून प्रकरणी पित्यासह तिघांना जन्मठेप
बारामती : खडकी (ता. दौंड) येथील दोघा जणांच्या खूनप्रकरणी, तसेच तिघा जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडिलांसह दोन मुलांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या सुनावणीसाठी आरोपींच्या नातेवाइकांसह परिसरातील अनेकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती.
अनिल विठ्ठल काळे व त्यांची दोन मुले सचिन आणि उमेश काळे (रा़ शितोळेवस्ती, खडकी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत़ या प्रकरणात जालिंदर जयवंत काळे आणि गणेश ऊर्फ बापूसाहेब काळे यांचा खुन झाला होता़ ही घटना २९ आॅक्टोंबर २०१२ रोजी दौंड तालुक्यातील खडकी येथील शितोळेवस्तीमध्ये घडली होती़
दौंडमध्ये गाजलेल्या या खुनप्रकरणी सत्र न्यायाधीश आऱ डी़ सावंत यांनी तिघांना दोषी ठरविले होते़ त्यानंतर शिक्षा संदर्भात आज दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यात आला़ जिल्हा सरकारी वकील विजयसिंह मोरे पाटील म्हणाले, की या गुन्ह्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, तिघांच्या खुनाचा प्रयत्न झाला़
न्यायाधीशांनी यावेळी आरोपींना शिक्षेबाबत विचारणा केली, त्यावर अनिल विठ्ठल काळे याने वयाचा विचार करून कमीत कमी शिक्षा व्हावी. सचिन अनिल काळे याने, माझे शिक्षण व २०१२ मध्ये झालेल्या विवाहाचा विचार करून कमीत कमी शिक्षा व्हावी, असे सांगितले. तसेच, उमेश अनिल काळे याने शिक्षेबाबत काहीच सांगावयाचे नाही, असे मत व्यक्त केले.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर
जिल्हा व सत्र न्यायाधीश सावंत म्हणाले,
की आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला,
तरी तो दुर्मिळातील दुर्मिळ स्वरुपाचा नाही.
त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देता येणार नाही.
तिघा पिता-पुत्रांना आजन्म कारावासाची
शिक्षा योग्य राहील.
४जालिंदर जयवंत काळे, गणेश ऊर्फ बापूसाहेब जालिंदर काळे यांच्या खुनाबद्दल तिघा पिता-पुत्रांना दुहेरी आजन्म कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच, किरण दत्तात्रय काळे, मच्छिंद्र जयवंत काळे आणि आदिनाथ मच्छिंद्र काळे या तिघांचा खून करण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी ७ वर्षे कारावास आणि ६ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद आणि घटनेतील खून झालेल्या व्यक्ती व जखमींना जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत १ वर्ष कारावास व ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
शेतीच्या कारणावरुन काढली कुरापत
या घटनेची पार्श्वभूमी अशी, दि. २९ आॅक्टोबर २०१२ रोजी सकाळी साडेअकरा वाजता खडकी शितोळेवस्ती नं. २ (ता. दौंड) येथे सोलापूर महामार्गालगत शेतात हा प्रकार घडला. या वेळी जालिंदर जयवंत काळे, बापूसाहेब जालिंदर काळे तसेच आदिनाथ मच्छिंद्र काळे हे त्यांना गावातील आरोपी अनिल विठ्ठल काळे, त्यांची दोन मुले सचिन अनिल काळे, उमेश अनिल काळे हे नेहमी शेतीच्या कारणावरून काही तरी कुरापत काढून त्रास देत असत़ तुला व तुझ्या पोरांना खल्लास करतो, अशी जिवे मारण्याची धमकी देतात, असे सांगत होते. याच वेळी तिघे आरोपी वडील, दोन मुले त्यांच्या घराकडून मोठ्याने शिवीगाळ करीत आले. अनिल काळे याच्या हातात लाकडी दांडके, उमेश याच्या हातात धारदार सुरा, तर सचिन याच्या हातात लोखंडी गज, अशी हत्यारे होती. जालिंदर जयवंत काळे, बापूसाहेब जालिंदर काळे यांना काही समजण्याअगोदर उमेश काळे याने हातातील धारदार सुऱ्याने पाठीमागून व पुढून सपासप वार केले. त्यामध्ये दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. या वेळी किरण काळे, आदिनाथ काळे व मच्छिंद्र काळे त्यांना वाचविण्यासाठी गेले होते. उमेश याने ‘हरामखोरांनो तुम्हालाही जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत किरण काळे याच्या डाव्या बरगडीत सुऱ्याने वार केला़ त्याला किरण काळे याने प्रतिकार केला. २१आॅक्टोबर २०१२ रोजी किरण दत्तात्रय काळे यांनी तक्रार दिली.