कोणा-कोणाला लस दिली, त्याची पालिकेकडे नाही नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST2021-02-16T04:12:17+5:302021-02-16T04:12:17+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय ...

कोणा-कोणाला लस दिली, त्याची पालिकेकडे नाही नोंद
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. पालिकेला ९५ हजारांचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. शनिवारपर्यंत (१३ फेब्रुवारी) २६ हजार ५२९ जणांना ही लस देण्यात आली आहे. परंतु, यामध्ये डॉक्टर, नर्स, मेडिकलचे विद्यार्थी, फिल्ड हेल्थ वर्कर, पॅरामेडिकल कर्मचारी यांच्या लसीकरणाची स्वतंत्र आकडेवारीच पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
लसीकरणासाठी शासनाने चार टप्पे ठरवून दिले आहेत. शहरात सुरुवातीपासूनच लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळालेला आहे. पहिल्या टप्प्यात अवघा २० टक्केच प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रंटलाईन वर्कर’ला लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारीपासून दुसरा टप्पा सुरु झाला असून गेल्या आठवडाभरात अवघ्या ५१४ जणांनीच लस घेतली आहे. त्यामुळे पालिकेची लसीकरण मोहीम अद्यापही थंडावलेलीच आहे. तशीच परिस्थिती लसीकरणाची आकडेवारी ठेवण्यातही दिसते आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडे शहराचे एकूण लक्ष्य किती होते, प्रत्यक्ष लसीकरण किती झाले? याची एकत्रित आकडेवारी उपलब्ध आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार कोणत्या घटकाला किती लसीकरण झाले? याची आकडेवारी ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे लसीकरणात डॉक्टर पुढे की नर्स हे समजत नाही. मेडिकल विद्यार्थी, फिल्ड हेल्थ वर्कर, नर्स आणि सुपरवायझर, पॅरामेडिकल स्टाफ यांच्यासाठी एकूण लक्ष्य किती होते? तसेच प्रत्यक्षात किती लसीकरण झाले? याची आकडेवारी ठेवणे आवश्यक होते. परंतु, तशी आकडेवारी ठेवली जात नसल्याचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
---------------------
लसीकरणाचा वेग कमी
लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, या टप्प्यात शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलीस आदींना लस दिली जाणार आहे. परंतु, या टप्प्याचा वेगही अतिशय कमी आहे. या टप्प्यातील अधिकारी-कर्मचारी यांचीही आकडेवारी वर्गवारीनुसार ठेवली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.