नगरपालिकेला हुतात्मा स्तंभाचा विसर
By Admin | Updated: October 3, 2015 01:34 IST2015-10-03T01:34:42+5:302015-10-03T01:34:42+5:30
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच बारामती नगरपालिका प्रशासनाला हुतात्मा स्तंभाचा विसर पडला. शुक्रवारी (दि. २) महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या

नगरपालिकेला हुतात्मा स्तंभाचा विसर
बारामती : महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच बारामती नगरपालिका प्रशासनाला हुतात्मा स्तंभाचा विसर पडला. शुक्रवारी (दि. २) महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी हातात झाडू घेऊन स्तंभाची स्वच्छता केली.
१५ आॅगस्ट, २६ जानेवारीसह क्रांतीदिन आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करण्यासाठी माजी स्वातंत्र्य सैनिक एकत्रित येतात. त्यामुळे या कार्यक्रमाची आदल्या दिवशी स्तंभाची स्वच्छता करण्यात येते. यंदा मात्र नगरपालिका प्रशासनाने महात्मा गांधी जयंती दिनाचा विसर पडला. हुतात्मा स्तंभ भोवती साठलेला कचरा जैसे थे होता. शुक्रवारी सकाळी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी माजी स्वातंत्र्य सैनिक एकत्रित आले होते. मात्र, येथील स्वच्छता केली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी कोणाकडेही तक्रार न करता थेट झाडू हाती घेतले. सकाळी १० वाजता नगरपालिका प्रशासनाला याबाबत माहिती समजली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अग्निशामक वाहने पाठवून पाणी फवारून स्वच्छता केली. त्यानंतर हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरपालिकेच्या या उदासीनतेबद्दल माजी स्वातंत्र्यसैनिक नीलेशभाई कोठारी यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाच्या आवाहनानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही मोहीम बारामती शहरात राबविली. त्यासाठी पवार कुटुंबीयांनी झाडू हाती घेतले होते. त्या वेळी पवार यांनी स्वच्छतेबाबत सातत्य राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रशासनानेही दुर्लक्षित केल्याचे आजच्या घटनेने अधोरेखित झाले़