पालिकेचे वॉर्डन आता बीआरटी मार्गावर
By Admin | Updated: January 16, 2015 03:17 IST2015-01-16T03:17:17+5:302015-01-16T03:17:17+5:30
महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले १४५ ट्रॅफिक वॉर्डन काढून घेण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरक्षा विभागाला दिले आहेत.

पालिकेचे वॉर्डन आता बीआरटी मार्गावर
पुणे : महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले १४५ ट्रॅफिक वॉर्डन काढून घेण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरक्षा विभागाला दिले आहेत. बीआरटी मार्गावर खासगी वाहने शिरून अपघात होत असल्याने त्या ठिकाणी हे वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत. या आदेशाची कार्यवाही पूर्ण करण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार असून, फेब्रुवारी महिन्यात याची अंमलबजावणी होणार आहे.
शहरामध्ये वाहतुकीचा ताण वाढल्याने त्याचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी वाहतूक विभागाकडून महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून वाहतूक विभागाशी करार करून त्यांना १४५ ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांचा संपूर्ण पगार महापालिकेकडून देण्यात येत आहे.
वाहतूक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी महापालिकेला वॉर्डन परत करावेत अशी अट करारामध्ये घालण्यात आली होती. गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक विभागाकडील कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. हडपसर व सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावर अपघातांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर आता आळंदी रस्ता व नगर रोड येथील बीआरटी मार्ग मार्चअखेर पर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहेत. बीआरटी मार्गात खासगी वाहने शिरू नयेत याची दक्षता घेण्याची मोठी गरज आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहतूक विभागाकडील वॉर्डन काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)