महापालिकेची अग्निशमन यंत्रणा वार्यावर
By Admin | Updated: June 9, 2014 23:37 IST2014-06-09T23:05:19+5:302014-06-09T23:37:12+5:30
आगीच्या दूर्घटनेनंतर तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिकेच्या मुख्यभवनात उभारण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वा-यावर पडण्याची शक्यता आहे.

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा वार्यावर
पुणे : दोन वर्षापूर्वी मंत्रालयात लागलेल्या आगीच्या दूर्घटनेनंतर तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिकेच्या मुख्यभवनात उभारण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वा-यावर पडण्याची शक्यता आहे. ही यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी अग्निशमन विभागाने घ्यावी यासाठी भवन विभागाने दलास पत्र पाठविले आहे. तर अग्निशमनदलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तसेच संपूर्ण शहराची जबाबदारीही दलाकडेच असल्याने भवन विभागानेच ते काम पहावे अशी भूमिका अग्निशमनदलाच्या अधिका-यांनी घेतली आहे. मागील आठवडयातच या यंत्रणेची अंतिम चाचणी झाली असून ही यंत्रणा वापरासाठी सज्ज आहे.
मंत्रालयात लागलेल्या आगीच्या दूर्घटनेऩंतर सर्व शासकीय कार्यालयांनी अग्निशमन यंत्रणा तत्काळ उभारण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार, तब्बल तीन कोटी रूपये खर्चून महापालिका प्रशासनाने मुख्यभवनात अग्निशमन यंत्रणा उभारलेली आहे. त्याची अंतिम चाचणीही नुकतीच पार पडली असून ही यंत्रणा वापरण्यासाठी तयार आहे. मात्र, ही यंत्रणा वापरासाठी अद्याप कोणतेही मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती भिंतीवर शोभेपुरतीच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही यंत्रणा भवन विभागाने उभारलेली आहे. त्यामुळे तीच्या देखभालाची जबाबदारीही भवन विभागाची आहे, तर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असणा-या कर्मचा-यांना ती वापरण्याची माहिती आहे. त्यामुळे भवन विभागाने ही यंत्रणा या पुढे अग्निशमन विभागाने सांभाळावी असे पत्र दलास दिले आहे. मात्र, दलाकडून त्यास नकार दिला आहे. अग्निशमनदलावर संपूर्ण शहराची जबाबदारी आहे. तसेच आधीच दलाची यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे ही जबाबदारी भवन विभागानेच स्विकारावी अशी भूमिका अग्निशमनदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी घेतली आहे. परिणामी ही वापरासाठी सज्ज असलेली यंत्रणा रामभरोसेच महापालिकेत उभी असून एखादी दूर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही यंत्रणा उभारण्याआधी तीची अंमलबजावणी कोण करणार याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नाही. शासनाचा आदेश म्हणून गडबडीने ही यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. ही यंत्रणा वापरण्यासाठी महापालिकेच्या कर्मचा-यांना प्रशिक्षणही देण्यात येणार होते. मात्र, अद्यापही हे प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कोणतीही दूर्घटना घडल्यास काय करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.