जुन्या रिंगरोडसाठी महापालिका देणार हमीपत्र
By Admin | Updated: September 24, 2015 03:15 IST2015-09-24T03:15:39+5:302015-09-24T03:15:39+5:30
तब्बल २७ वर्षे रखडलेल्या शहरातील हाय कॅपॅसिटी मास ट्रॅन्झिस्ट रुट (एचसीएमटीआर) या प्रकल्पाच्या घोरपडी येथील ३०० मीटर क्षेत्रातील जागामालकांनी आपली जागा पालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे.

जुन्या रिंगरोडसाठी महापालिका देणार हमीपत्र
पुणे : तब्बल २७ वर्षे रखडलेल्या शहरातील हाय कॅपॅसिटी मास ट्रॅन्झिस्ट रुट (एचसीएमटीआर) या प्रकल्पाच्या घोरपडी येथील ३०० मीटर क्षेत्रातील जागामालकांनी आपली जागा पालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे.
पालिकेत बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीला या क्षेत्रातील चारही जागामालक उपस्थित होते. उपमहापौर आबा बागूल यांच्या दालनात ही बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपायुक्त (विशेष) अनिल पवार, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नगरसेविका सुरेखा कवडे आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाने सध्या भूसंपादनाची कारवाई स्थगित ठेवल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र, बागूल यांनी याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूसंपादनाची कारवाई सुरूच असल्याची माहिती दिली. बागूल यांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या अशा धोरणामुळेच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प रेंगाळला आहे, असे ते म्हणाले. या धोरणामुळे प्रकल्पाची मूळ किंमत वाढते व नंतर ती महापालिकेच्या आवाक्यात राहत नाही, त्यामुळे यापुढे अशी दिशाभूल करणारी माहिती देऊ नये, असे त्यांनी सांगितले. कशा स्वरूपात मोबदला हवा हे कळाल्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चा करून तसे लेखी पत्र त्यांना देण्याची तयारी बकोरिया यांनी दर्शवली. बागूल यांनी याबाबतची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ३०० मीटरचा हा प्रश्न लवकर मिटला, तर काम लगेचच सुरू करता येईल. रस्ता झाला तरीही कामाला गती येईल, असे ते म्हणाले.