अपात्र ठेकेदाराला दिले पालिकेने १५ कोटींचे काम
By Admin | Updated: February 23, 2015 00:50 IST2015-02-23T00:50:46+5:302015-02-23T00:50:46+5:30
महापालिकेला रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेल्या ठेकेदाराला ठेक्यामध्ये १५ कोटी रूपयांचा वाटा देण्याचा बेकायदेशीर ठराव स्थायी

अपात्र ठेकेदाराला दिले पालिकेने १५ कोटींचे काम
पुणे : महापालिकेला रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेल्या ठेकेदाराला ठेक्यामध्ये १५ कोटी रूपयांचा वाटा देण्याचा बेकायदेशीर ठराव स्थायी समितीने मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. स्थायी समितीमधील काही सदस्यांची मुदत संपत असताना जाता जाता ठेकेदाराच्या फायद्याचा निर्णय स्थायी समितीकडून घेण्यात आला आहे.
महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये व इतर ठिकाणी ११०० रखवालदार पुरविण्याची निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेमध्ये पात्र ठरलेल्या ४ ठेकेदारांनी प्रत्येकी २७५ ठेकेदार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दोन आाठवडयापूर्वी घेण्यात आला. त्याकरिता १४ कोटी ८५ लाख ३० हजार रुपयांची निविदा मंजूर केली होती.
स्थायी समितीमधील सदस्य रवींद्र धंगेकर, पृथ्वीराज सुतार आणि शंकर केमसे यांनी या निविदेचा फेरविचार करण्याचे पत्र स्थायी समितीला दिले. त्यानुसार मागील बैठकीमध्ये हा विषय फेरविचारासाठी आला असताना केमसे आणि धंगेकर यांनी या कामामध्ये बंदुकधारी रखवालदार पुरविण्यासाठी श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. यांचा समावेश करावा, अशी उपसूचना दिली. या उपसूचनेसह ठरावास स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये १५ ठेकेदार सहभागी झाले होते, त्यापैकी ११ जण अपात्र ठरले. उर्वरित चौघा जणांचे दर जवळपास सारखेच होते. यातील दोघांनी ४३२ रुपये ७८ पैसे; तर अन्य दोघांनी ४३२ रुपये ७९ पैसेएवढा दर दिला आहे. त्यामुळे याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. तर अन्य एका ठेकेदाराने ४३२ रुपये ५ पैसे इतका दर दिला होता. मात्र धुलाई भत्ता, गणवेश, रजा वेतन यांचे दरपत्रक चुकीचे असल्याने सांगून त्या ठेकेदाराचा ठेका रदद्बातल करण्यात आला आहे.