पालिकेचे दवाखाने सुटीवरच

By Admin | Updated: March 15, 2015 00:28 IST2015-03-15T00:28:31+5:302015-03-15T00:28:31+5:30

आजाराला प्रतिबंध करण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सर्व शासकीय डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुट्या रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Municipal clinics are on holidays | पालिकेचे दवाखाने सुटीवरच

पालिकेचे दवाखाने सुटीवरच

राहुल कलाल/सुनील राऊत ल्ल पुणे
पुण्यात स्वाइन फ्लूने थैमान घातलेले असून, दररोज बळी जात आहेत. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सर्व शासकीय डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुट्या रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. शहरातील स्वाइन फ्लूची स्थिती हाताबाहेर जात असताना पालिकेचे दवाखाने मात्र शनिवारची अर्धी सुटी घेऊन बंद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली. यावरून पालिकेचा आरोग्य विभाग पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात गेल्या अडीच महिन्यांपासून स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. आतापर्यंत पुण्यात या आजाराने ५४ जणांचा बळी गेला आहे. तर, तब्बल ६४३ जणांना याची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे दिसताच तपासणीसाठी पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी महिन्यात दिवसाकाठी एक हजारापर्यंत तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण होते. ते मार्चमध्ये तीन हजारांच्या घरात पोहोचले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी स्वाइन फ्लूची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे १ मार्चला पुण्यातील स्वाइन फ्लूचा आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सर्व शासकीय दवाखाने, रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या शनिवार, रविवारसह इतर सर्व सुट्या रद्द करण्याचे आदेश दिले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्यांना त्यांच्या घराजवळच मोफत तपासणी आणि औषधोपचार मिळावेत, यासाठी हा आदेश देण्यात आला होता. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने परिपत्रक काढून पालिकेच्या सर्व दवाखान्यांमधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांच्या सुट्य रद्द केल्याचे जाहीर केले होते.
पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये दर शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी सुटी होती. मात्र, या आदेशान्वये या सुट्या रद्द झाल्या. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी पूर्ण दिवस हे दवाखाने सुरू राहणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याच सुट्या रद्द करण्यात आलेल्या नसल्याचे आज केलेल्या स्टिंग आॅपरेशमधून समोर आले आहे.
एरंडवणा येथील यशवंत विष्णू थरकुडे दवाखाना, नारायण पेठेतील कलावतीबाई मावळे दवाखाना, दत्तवाडीतील आनंदीबाई गाडगीळ दवाखाना शनिवार असल्याने दुपारी एक वाजताच बंद झाला. त्यानंतर तपासणीसाठी रुग्ण या दवाखान्यांमध्ये येत होते. मात्र, दवाखान्यांना टाळे ठोकून डॉक्टर आणि कर्मचारी घरी निघून गेले होते. विशेष म्हणजे, पुणे महापालिकेला लागून असलेल्या शिवाजीनगर येथील जंगलराव कोंडिबा अमराळे दवाखाना आणि महापालिकेच्या सर्व दवाखान्यांना जेथून औषध पुरवठा होतो त्या गाडीखान्यातही दुपारी एकच्या अगोदरच बाह्य रुग्ण तपासणी विभाग बंद झाला होता. यातून पालिकेला स्वाइन फ्लूचे काहीच घेणे देणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

४महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार मोफत आहेत. एखाद्या रूग्णास या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर पालिकेकडून त्यास मोफत टॅमीफ्लूचे उपचार सुरू केले जातात. गेल्या तीन वर्षांपूर्वी या साथीचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने राबविलेल्या उपाययोजनांमुळे ही साथ आटोक्यात आली होती. त्यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या दवाखान्यांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी पालिकेची रूग्णालये बंद असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूची तपासणी आणि त्याच्या उपचारासाठी नागरिकांना खासगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत असून, अनेक ठिकाणी नागरिकांची लूट होत असल्याच्याही तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

सुरक्षा वाऱ्यावर
४महापालिकेच्या या रूग्णालयांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक दवाखान्यात सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी दुपारी १ नंतर केलेल्या या दवाखान्यांच्या, तसेच रूग्णालयांच्या पाहणीत कोणत्याही ठिकाणी सुरक्षारक्षक आढळून आले नाहीत.
४एवढेच काय, तर महापालिकेच्या रूग्णालयांसाठी औषध वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या गाडीखाना येथील मध्यवर्ती औषध वितरण केंद्रातही कोणी सुरक्षारक्षक नव्हता.
४ दरवर्षी सुरक्षारक्षकांच्या नावाखाली खर्च केले जाणारे कोट्यवधी रूपये जातात कोठे? असा सवाल उपस्थित होत आहे.

आरोग्यप्रमुख, अधिकारी सुटीवर
४स्वाइन फ्लूच्या उद्रेकामुळे पुण्यात आणीबाणीसारखी स्थिती झालेली असतानाच पालिकेचे आरोग्यप्रमुख आणि त्यांचे अधिकारीही सुटीवर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेतील आरोग्यविभागही टाळे लावून बंद करण्यात आला होता.

 

Web Title: Municipal clinics are on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.