बहुरंगी, बहुढंगी ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’!
By Admin | Updated: February 11, 2017 02:56 IST2017-02-11T02:56:48+5:302017-02-11T02:56:48+5:30
‘शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती जे! वेडे जगती मनाप्रमाणे, मग जगही त्यांच्या मागे वेडे!’, या ओळींमधून जगावेगळे काहीतरी करूपाहणाऱ्या ‘वेड्या’

बहुरंगी, बहुढंगी ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’!
पुणे : ‘शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती जे! वेडे जगती मनाप्रमाणे, मग जगही त्यांच्या मागे वेडे!’, या ओळींमधून जगावेगळे काहीतरी करूपाहणाऱ्या ‘वेड्या’ माणसांच्या ‘शहाणपणा’ची अनुभूती येते. रसिकांना समृद्ध करणारी हीच अनुभूती अभिवाचन, गाणे, नाट्यानुभव, कविता अशा बहुरंगी, बहुढंगी खजिन्यातून रसिकांना अनुभवता येणार आहे. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’ या पुस्तकावर आधारित भरगच्च खजिना नाट्यानुभव आणि अभिवाचनातून खुला होणार आहे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज (दि.११) सायंकाळी साडेपाच वाजताही मेजवानीचा आनंद लुटता येईल.
डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’ या पुस्तकाचे प्रकाशन २६ जानेवारी रोजी अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात शहाणी माणसं बनवण्याचा चाललेला आटापिटा, जगाप्रमाणे चालण्याची रीत, ही चौकट मोडून काहीतरी वेगळे करू पाहणारी ‘वेडी’ माणसं, सोशल मीडिया असे विविध कंगोरे कौशल्याने टिपले आहेत. त्यामुळे पुस्तकात जणू जिवंत जीवनानुभवच साकारला आहे. या पुस्तकावर आधारित अभिवाचन आणि नाट्यानुभवाचा कार्यक्रम पुणे, डोंबिवली आणि नाशिक येथे सादर झाला. रसिकांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता, ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’ अनुभवण्याची संधी पुणेकरांना पुन्हा एकदा चालून आली आहे.
याबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘चित्र दिवाणखान्यात टांगून पाहुण्यांना त्यातली गंमत नाही तर किंमत सांगणारी ही शहाणी माणसं भवताली पहायला मिळतात. मात्र, या फॅक्टरीत चौकट मोडू पाहणाऱ्या वेड्यांना एका वेड्याकडून दिलेली सप्रेम भेट म्हणजे ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’! यामध्ये धमाल गोष्टींपासून ग्रेसच्या कवितांपर्यंत सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकाबाबत वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गोष्ट, प्रसंग जणू आपल्याच आयुष्यात घडल्याची जाणीव प्रत्येकाला होईल, इतका जिवंतपणा यात आहे. हा आविष्कार कविता, गाणी, नाटुकली, अभिवाचन यातून साकारला आहे.’