मुहूर्त बंडखोरीचा!

By Admin | Updated: September 27, 2014 07:21 IST2014-09-27T07:19:58+5:302014-09-27T07:21:30+5:30

कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला

Muhurat rebellion! | मुहूर्त बंडखोरीचा!

मुहूर्त बंडखोरीचा!

पुणे : कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती फुटल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संधीतून आजचा दिवस पक्षांतरांचा ठरला. इच्छुकांनी आपल्या पक्षातून संधी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला.
जिल्हा बॅँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूर तालुक्यात आता हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे आणि भाजप-रासप युतीचे जगदाळे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. गेल्या वेळी जगदाळे यांनी अपक्ष म्हणून लढणारे भरणे यांना साथ दिली होती. याही वेळी महाआघाडीच्या माध्यमातून भरणे आणि जगदाळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, आघाडी तुटल्याने भरणे यांना थेट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार आहे.
पुरंदरमधून राष्ट्रवादीचे राहुल शेवाळे यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे शिवतारे यांच्या विरोधात शेवाळे लढू शकतील. राष्ट्रवादीकडून बहुसंख्य इच्छुक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी ऐन वेळी उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन तावरे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तावरे यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. शिवसेनेकडून जुन्नरमधून आशाताई बुचके यांना उमेदवारी जाहीर झाल्याने येथील इच्छुक माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांना भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. माजी जि.प. सदस्य प्रसन्न डोके, शिवसेनेतील जुन्नरचे माजी नगराध्यक्ष सुनिल मेहेर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
खेडमध्ये परिवर्तन आघाडी स्थापण्यात पुढाकार घेणारे शरद बुट्टे-पाटील हे युती फुटल्याचा निर्णय जाहीर होताच भाजपामध्ये गेले आहेत. शरद बुट्टे-पाटील हे राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य व कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती होते. तर, राष्ट्रवादीचेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वेळी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली होती. दिलीप मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली होती. मावळमधील माऊली दाभाडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
शिरूरमधून राष्ट्रवादीचे मंगलदास बांदल हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. गेल्या वेळी बांदल अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. भाजपमधून राष्ट्रवादीत व पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्री पलांडे यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Muhurat rebellion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.