साहित्य संस्कृती मंडळाच्या बैठकीला मुहूर्त
By Admin | Updated: September 14, 2015 04:44 IST2015-09-14T04:44:50+5:302015-09-14T04:44:50+5:30
मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाचा कारभार जवळपास अडीच-तीन वर्षे ठप्पच होता.

साहित्य संस्कृती मंडळाच्या बैठकीला मुहूर्त
पुणे : मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाचा कारभार जवळपास अडीच-तीन वर्षे ठप्पच होता. राज्य शासनाने मंडळाची पुनर्रचना केल्यानंतर बैठकीलाही मुहूर्त मिळाला असून, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील संस्थांनाही अनुदान मिळण्यासाठी विचार झाला.
मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर या मंडळाची राज्य शासनाने पुनर्रचनाच केली नव्हती. त्यामुळे अडीच-तीन वर्षे मंडळाचे कामकाज ठप्प होते. मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड यांची नियुक्ती करून समितीचीही पुनर्रचना करण्यात आल्यानंतर मंडळाची पहिली बैठक मुंबईत झाली. दर तीन महिन्यांनी मंडळाची बैठक घेण्याची तयारीही या बैठकीत दर्शविण्यात आली.
विश्व कोष मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी राज्य विकास संस्था, मराठी भाषा सल्लागार समिती महाराष्ट्रात कार्यरत आहे. प्रत्येक संस्थेचे कामकाज ठरलेले आहे. या संस्थांमध्ये जे कामकाज चालते त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्या दृष्टीने धोरण ठरविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
पहिली बैठक असली, तरी काही धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. इंग्रजी ग्रंथांना पुरस्कार दिले जावे, क्रीडा विभागासाठी स्वतंत्र पुरस्कार असावा, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा सत्कार करण्यात यावा, या दृष्टीने चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)