चिखलसेतील बंधारा पावसाळ्यात कोरडा
By Admin | Updated: August 15, 2014 00:55 IST2014-08-15T00:55:37+5:302014-08-15T00:55:37+5:30
वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चिखलसे येथे वनविभागाने बांधलेला बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा ठणठणीत आहे.

चिखलसेतील बंधारा पावसाळ्यात कोरडा
वडगाव मावळ : वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चिखलसे येथे वनविभागाने बांधलेला बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा ठणठणीत आहे.
चिखलसे वनक्षेत्रातील पशू-पक्षी उन्हाळ्यात अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी लोकवस्तीकडे येतात. त्या वेळी त्यांना कुत्रे हल्ला करून मारत असल्याच्या घटना घडत होत्या. हे प्राणी वनक्षेत्राजवळीेल शेतीतील पिकांचे नुकसानही करीत होते. त्यामुळे वन्य पशू-पक्ष्यांच्या अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
त्याचा विचार करून वनविभागाने वन्य पशू-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मे २०१४ रोजी वनक्षेत्रात बंधारा बांधला. तो बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा आहे. गट नंबर २४४ मधील ८८ हेक्टर वनक्षेत्रात मोर, ससे, हरीण, कोल्हे, रानमांजर, रानडुकरे, रानकोंबड्यांचे वास्तव्य आहे. बंधाऱ्यांच्या बांधकामाबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच बाळासाहेब काजळे, विजय काजळे, उपसरपंच नीलेश काजळे, सदस्य वंदना भांडे यांनी केली आहे.
बाळासाहेब काजळे म्हणाले, ‘‘वनविभागाने हा बंधारा तयार करताना ग्रामस्थांना विश्वास न घेता चुकीच्या ठिकाणी बांधला आहे. पहिल्याच पावसात बंधाऱ्यात पाण्याचा टिपूसही नाही.’’
विजय काजळे म्हणाले, ‘‘हा बंधारा आणखी २०० मीटर पुढे बांधला असता, तर बंधाऱ्यात मार्च-एप्रिलपर्यंत पाणी साठा राहिला असता.’’
नीलेश काजळे म्हणाले, ‘‘बंधाऱ्याचा बांध जितका आहे तितका सुद्धा पाणीसाठा होणार नसल्याचे दिसत आहे.’’ (वार्ताहर)