महावितरणने तोडली पोलीस ठाण्यांची वीज

By Admin | Updated: March 14, 2015 06:19 IST2015-03-14T06:19:24+5:302015-03-14T06:19:24+5:30

स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कार्यालयासह खडक, स्वारगेट, सहकारनगर, दत्तवाडी पोलीस ठाण्यांच्या आणि पोलीस चौक्यांचा वीजपुरवठा

MSEDCL has broken the power of the police stations | महावितरणने तोडली पोलीस ठाण्यांची वीज

महावितरणने तोडली पोलीस ठाण्यांची वीज

पुणे : स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कार्यालयासह खडक, स्वारगेट, सहकारनगर, दत्तवाडी पोलीस ठाण्यांच्या आणि पोलीस चौक्यांचा वीजपुरवठा महावितरणने शुक्रवारी दुपारी खंडित केला. गेल्या वर्षभरापासून पोलीस ठाणे आणि चौक्यांचे तब्बल १७ लाखांचे बिल थकीत आहे. महावितरणने वारंवार ही बिले भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शुक्रवारी पोलिसांचे कामकाज अंधारात सुरू होते.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षापासून खडक, सहकारनगर, स्वारगेट, दत्तवाडी पोलीस ठाणे आणि या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चौक्यांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणकडून पोलिसांना थकीत बिल भरण्याबाबत वारंवार विनंती करण्यात येत होती. परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महावितरणने रेटा लावल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार दिवसांची मुदत मागितली होती. परंतु ही मुदत उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी बिल भरले नाही. त्यानंतर पुन्हा १० मार्चपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली. महावितरणने ती मुदतवाढही दिली. परंतु पोलिसांनी पुन्हा महावितरणचे पैसे भरलेच नाहीत. शेवटी तीन दिवस वाट पाहून शुक्रवारी वीज तोडण्यात आली. महावितरणने कारवाईमध्ये पक्षपातीपणा केल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आशिष साबळे यांनी केला आहे.
कॉंग्रेसचे कार्यकर्ते हृषीकेश बालगुडे यांनी अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून महावितरणकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. दरम्यान, पोलीस आयुक्तालयाकडून संध्याकाळी ८ लाख रुपयांचा धनादेश महावितरणकडे जमा करण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा खडक पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
महावितरणचे अतिरिक्त आयुक्त (प्रशासन) अब्दुर रहमान यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)

Web Title: MSEDCL has broken the power of the police stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.