सत्ताधाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: May 11, 2017 04:14 IST2017-05-11T04:14:59+5:302017-05-11T04:14:59+5:30
नगरपरिषदेच्या हद्दीतील पथदिव्यांच्या खंडित वीजपुरठ्याचे निमित्त करुन विरोधी गट मेणबत्ती मोर्चा, मशाल मोर्चासारखी आंदोलने करीत आहे.

सत्ताधाऱ्यांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : नगरपरिषदेच्या हद्दीतील पथदिव्यांच्या खंडित वीजपुरठ्याचे निमित्त करुन विरोधी गट मेणबत्ती मोर्चा, मशाल मोर्चासारखी आंदोलने करीत आहे. या आंदोलनाद्वारे नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विरोधी गटाच्या नगरसेवक व त्यांच्या पाठीराख्यांना शह देण्यासाठी, पथदिव्यांचा वीजपुरवठ्याचा प्रश्न तडीस लावण्यासाठी सत्ताधारी गटानेच रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी नागरिकांसमवेत महावितरणच्या कार्यालयासमोर रास्ता रोको व बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
येत्या गुरुवार (दि. ११) पासून हे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे. निवेदनावर नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील व इतर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या सह्णा आहेत.
या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नगराध्यक्ष अंकिता शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे नमूद केले आहे की, सन १९९७ पासून नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व दिवाबत्ती विभागाची वीजबीलाची बाकी थकीत राहिली आहे. नगरपरिषद प्रत्येक महिन्याचे वीजेचे चालू बील नियमितपणे भरत आहे. दि. १३ एप्रिल २०१७ रोजी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांची समक्ष भेट घेतली.
थकीत वीजबीलाचे वार्षिक समान पाच हप्ते करुन मिळावे ,असा प्रस्ताव शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर सादर केला. शासनस्तरावर त्याबाबत निर्णय होईपर्यंत चालू बीले जमा करुन घ्यावीत. वीजपुरवठा खंडित करण्यात येवू नये, अशी मागणी केली.
या आशयाचे निवेदन दि.२८ एप्रिल रोजी वीज वितरण कंपनीचे बारामती विभागाचे अधीक्षक अभियंता, दि. ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना ही देण्यात आले होते.