बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:12+5:302021-06-09T04:14:12+5:30
कनिष्ठ लिपिक पदभरती परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विठ्ठल भिगोट या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. त्याचे बलिदान व्यर्थ ...

बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी आंदोलन
कनिष्ठ लिपिक पदभरती परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विठ्ठल भिगोट या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा निर्धार करत पदभरती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संदीप भिंगारे, प्रकाश मुळे, परशुराम शेप, शिवाजी सरोदे, भूषण पाटील, सागर अंकुश, योगेश शिंदे, उमेश साळवे, पवन पांडे, अमोल गायके आदी उमेदवारांनी सोमवारी बोर्डाच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण सुरू केले. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनीही या वेळी आंदोलन करत राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांना निवेदन दिले. त्यावर येत्या पंधरा दिवसांत ५० टक्के पात्र उमेदवारांना कामावर रुजू करून घेतले जाईल, असे आश्वासन राज्य मंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी दिले असल्याचे यादव यांनी सांगितले.
----------
येत्या २० दिवसांत कार्यवाही पूर्ण करा
कनिष्ठ लिपिक पद भरती परीक्षा २०१९ मध्ये पार पडली. सुमारे २६६ जागांची ही भरती असून सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असताना पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नाही. मात्र, आंदोलनानंतर ५० टक्के पदांसाठी १५ दिवसांत पूर्ण करू आणि उर्वरित पदांची नियुक्ती शासन निर्णयानंतर त्वरित करू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु,येत्या २० दिवसांत कार्यवाही पूर्ण न झाल्यास आणि नियुक्ती आदेश न दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा उमेदवारांकडून बोर्डाच्या अधिकऱ्यांना दिला.