बारामतीत महायुतीच्या हालचाली
By Admin | Updated: January 26, 2017 00:04 IST2017-01-26T00:04:10+5:302017-01-26T00:04:10+5:30
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बारामती तालुक्यात सरळ लढतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विरोधात

बारामतीत महायुतीच्या हालचाली
बारामती : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बारामती तालुक्यात सरळ लढतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्वपक्षीय महायुतीच्या माध्यमातून आव्हान देण्याची तयारी सुरू असतानाच ‘तिसऱ्या आघाडी’ने डोके वर काढले आहे. या तिसऱ्या आघाडीला रोखण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबरोबरच महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रभावी कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीतील मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.
भाजपा, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडल्या. रासपाने १ जिल्हा परिषद गट, ५ पंचायत समिती गण मागितले आहेत. रिपाइं ज्या जागा मिळतील त्या पदरात पाडून घेण्यास तयार आहे. मागील निवडणुकीत विरोधकांनी जिल्हा परिषदेचा एक गट जिंकला होता. ४ जागा पंचायत समितीच्या जिंकल्या होत्या. त्यामुळे सध्या भाजपा-सेना सत्तेत असल्यामुळे बारामती तालुक्यात पक्षाचे बळ वाढवण्यासाठी भाजपाचे विशेष प्रयत्न आहेत. तर, विरोधकांपुढे तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार करतील, असे चित्र आहे.
नगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे जिल्हा परिषदेची १ आणि पंचायत समितीच्या २ जागा कमी झाल्या आहेत. पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. माळेगाव, सांगवी हे दोन गण या प्रवर्गासाठी राखीव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुकांची संख्या अधिक असली, तरी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाईल, हे निश्चित. सुपे मेडद गटात चुरशीची लढत होईल. त्यामुळे त्या गटात चांगला उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीची चाचपणी सुरू आहे. याशिवाय, करंजेपूल-निंबूत या गटात विरोधकांचा प्रभाव कमी करण्यासाठी खास प्रयत्न केले जातील. या गटातून १२ जण इच्छुक आहेत. परंतु, राजकीय तडजोड म्हणून काकडे कुटुंबातील इच्छुकाला जागा देण्याची शक्यता आहे. ते जवळपास निश्चित झाल्याची चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, वडगाव निंबाळकर-मोरगाव गटातदेखील अन्य गटातील मार्ग सुकर करण्यासाठी वेगळी राजकीय चाल खेळली जाईल, असे चित्र आहे. या गटात तब्बल २७ जण इच्छुक आहेत. या निवडणुकांमध्ये जातीय समीकरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. (वार्ताहर)