गोवंशहत्याबंदीसाठी चाकणमध्ये आंदोलन
By Admin | Updated: July 27, 2015 03:57 IST2015-07-27T03:57:09+5:302015-07-27T03:57:09+5:30
चाकणच्या गुरांच्या बाजारात अवैधरीत्या कत्तलीसाठी होणारी गोवंशाची खरेदी-विक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा

गोवंशहत्याबंदीसाठी चाकणमध्ये आंदोलन
चाकण : चाकणच्या गुरांच्या बाजारात अवैधरीत्या कत्तलीसाठी होणारी गोवंशाची खरेदी-विक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांनी चाकण (ता. खेड) येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात केली.
चाकणमधील गुरांच्या बाजारात अद्यापही मोठ्या प्रमाणावर गाई-बैलांची अवैध खरेदी विक्री होत असल्याचा आरोप करीत गोवंशहत्याबंदी कायदा मार्च महिन्यात मंजूर होऊनसुद्धा चाकणच्या बाजारात या कायद्याची अंमलबजावणी अजिबात होत नसल्याचे सांगत मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजारात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. या वेळी गोवंश रक्षणासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधनही करण्यात आले. या वेळी बजरंग दल आणि पुणे जिल्ह्यातील सर्व गोप्रेमी संघटनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
या वेळी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, बाजार समितीचे प्रशासक हर्षित तावरे, सचिव सतीश चांभारे, मार्केट असोसिएशनचे राम गोरे, माणिक गोरे, जमीर काझी, फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे राहुल वाडेकर, अनंता देशमुख, किरण झिंजुरके, संतोष रत्नपारखी आदींसह अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी येथील गुरांच्या बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे गुरांच्या बाजारात शुकशुकाट होता. (वार्ताहर)