शेतीपंपांची वीज खंडित केल्यास आंदोलन
By Admin | Updated: April 8, 2016 00:55 IST2016-04-08T00:55:50+5:302016-04-08T00:55:50+5:30
उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा आठ तासांपेक्षा कमी केला अथवा खंडित केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे

शेतीपंपांची वीज खंडित केल्यास आंदोलन
इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा आठ तासांपेक्षा कमी केला अथवा खंडित केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे उपसभापती नारायण वीर, कर्मयोगीचे संचालक वामनराव सरडे, बिभीषण बोंगाणे, अंकुश पाडुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उजनी धरणातील असणारे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र जलसंपत्ती विभाग प्राधिकरणाच्या ६ जानेवारीच्या उजनी धरणाच्या अचल साठ्यातील पाण्याचा सिंचनासाठी वापर करू नये, या निर्देशाचा आधार घेऊन सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी उजनी जलाशयावरील पुणे जिल्ह्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्या मागणीच्या अनुषंगाने ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र देऊन, पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे, असे अंकुश पाडुळे म्हणाले.
उजनी धरणात सद्यस्थितीला ४७ टीएमसी पाणी आहे. सोलापूर व पंढरपूर भागात पिण्यासाठी साडेचार टीएमसी सोडले, तरी ४३ टीएमसी पाणी शिल्लक राहते. इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त दोन ते अडीच टीएमसी पाणी लागणार आहे.
जानेवारी महिन्याच्या तुलनेत आत्ताची व पुढील दोन महिन्यांतील परिस्थिती अधिक गंभीर आहे. दुष्काळ तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती विभाग प्राधिकरणाचा आदेश कालबाह्य ठरलेला आहे, असे सांगून पाडुळे म्हणाले की, सन २०११-१२ मध्ये ऐन दुष्काळात उजनी धरणात ३८ टक्के पाणीसाठा असतानादेखील पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता, याचा विचार झाला पाहिजे. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)