मोहननगरावर शोककळा
By Admin | Updated: March 12, 2015 06:17 IST2015-03-12T06:17:53+5:302015-03-12T06:17:53+5:30
अपघाताची बातमी बुधवारी सकाळी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. ऐन सणादिवशी या परिसरात रंगाचा बेरंग झाला. भोसले कुटुंबावर काळाने घाला

मोहननगरावर शोककळा
पिंपरी : अपघाताची बातमी बुधवारी सकाळी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. ऐन सणादिवशी या परिसरात रंगाचा बेरंग झाला. भोसले कुटुंबावर काळाने घाला घातल्याने मोहननगर परिसरात शोककळा पसरली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शांतता पसरली होती.
बुधवारी सकाळी भोसले कुटुंबातील प्रलोभ भोसले याला पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. या वेळी घरात आई लिलाबाई व प्रसुतीसाठी आलेली त्यांची मुलगी होती. प्रलोभने प्रसंगावधान राखून घरातील आईला व बहिणीला छोटासा अपघात झाल्याचे सांगीतले. बिल्डिंग मधील रहिवासी व नगरसेवक अविनाश टेकवडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव, निलेश लुंकड घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, बिल्डिंगजवळ गर्दी वाढू लागली. परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. रंगपंचमीचा सण साजरा करण्यासाठी लगबग सुरु असताना अशी धक्कादायक घटनेची वार्ता आल्याने परिसरात शांतता पसरली.
मुळचे कोकणातील दत्तात्रय भोसले कामानिमित्त शहरात आले. सुरूवातील रामनगरात भाड्याच्या ते खोलीत रहात होते. १८ वर्षांपासून मोहननगरातील लिलाविहार इमातीमधील सदनिकेत राहत होते. टाटा मोटर्स कंपनीत ते काम करत होते. मनमिळावू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.
प्रवीण हा एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याला अभिनयाची आवड होती. त्याने आजवर चार नाटकांत काम केले आहे. हसतमुख व्यक्तिमत्व अशी त्याची ओळख होती. तीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. गावची यात्रा असल्याने भोसले कुटुंबीय रविवारी सकाळी चिंचवडहून कोकणातील खेड तालुक्यात असणाऱ्या खुपी शिरगाव या ठिकाणी गेले होते. यात्रेनिमित्त घरात पालखी आल्याने यात्रेचा आंनद घेऊन भोसले कुटुंब बुधवारी पहाटे चिंचवडकडे निघाले. प्रवीणला कामावर जायचे असल्याने इच्छा असूनही गावाला जास्त दिवस राहता आले नाही. त्यामुळेच त्यांनी रात्री निघण्याचा निर्णय घेतला. प्रविणची पत्नी खासगी कंपनीत कामाला होती. परंतु घरी कामे असल्याने सध्या ती सुट्टीवर होती. मनमिळाऊ स्वभाव असल्याने तिच्या जाण्याने येथील रहिवाशांना धक्का बसला आहे.त्यांचा दोन वर्षांचा मुलगा शौर्य हा या अपघातात काळाच्या पडद्याआड झाला. बिल्डिंगमधील सर्वचजण त्याला लाडाने पिल्लू म्हणत होते. रहिवाशांचे डोळे पाणावले होते.त्याच्या बरोबर खेळणारे बालचमुही स्तब्ध झाले होते. त्याचा गोंडस चेहरा सर्वांचाच लाडका होता. त्यामुळे ते पिल्लू घरात कमी; परंतु बिल्डिंग मधील रहिवाशांकडेच जास्त खेळायचे. मागील महिन्यात त्याचा वाढदिवस थाटात साजरा केला होता. कुटुंबातील पहिलाच मुलगा असल्याने तो सर्वांचाच लाडका होता. संगीता शिंदे या प्रवीणच्या सासु होत्या. त्यांना फिरण्याची खूप आवड होती. गावची यात्रा असल्याने त्याही भोसले परिवाराबरोबर गेल्या होत्या. कार्यक्रम कोणताही असो त्यांचा पुढाकार असायचा सर्वांशी आपुलकीने बोलायच्या. त्यामुळे त्यामुळे त्यांचा बोलका स्वभाव सर्वांनाच परिचित होता.(वार्ताहर)