एसटीची धडक बसून मोटार कोसळली दरीत
By Admin | Updated: January 8, 2015 01:12 IST2015-01-08T01:12:24+5:302015-01-08T01:12:24+5:30
१५० फुटांपर्यंत खोल दरीत गेलेल्या मोटारीतील सात जणांना अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलिसांनी बाहेर काढले.

एसटीची धडक बसून मोटार कोसळली दरीत
पुणे : कात्रज घाटात उतारावरून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटलेली एसटी बस समोरून येत असलेल्या मोटारीला धडकल्यामुळे ही मोटार थेट घाटातील दरीत कोसळली. १५० फुटांपर्यंत खोल दरीत गेलेल्या मोटारीतील सात जणांना अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलिसांनी बाहेर काढले. यामध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश होता. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सुरेश रघुनाथ शेट्ये (वय ५०), सागर सुरेश शेट्ये (वय २७), आरती सागर शेट्ये (वय २४), आकाश विठ्ठल तांगडे (वय २०), अश्विनी नामदेव खेडेकर (वय २७), विराज खेडेकर (वय २), स्वराज शेट्ये (वय ३ महिने, सर्व रा. अरण्येश्वर) अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांवर धनकवडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बसचालक मच्छिंद्र शंकर नरुटे (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. बी. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी मोटरीमधून शेट्ये कुटुंबीय वाई येथे जात असताना कात्रज घाटात भोर-स्वारगेट मार्गावरील पुण्याच्या दिशेने एसटी बस (एमएच १२-ईएफ ६३४२) येत होती, त्या वेळी हा अपघात घडला. घटनास्थळी वरिष्ठ निरीक्षक एम. बी. चव्हाण आणि पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक के. एस. करे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. (प्रतिनिधी)
वाहतूककोंडी
आणि बघ्यांची गर्दी
अग्निशामक दलाचे जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी दोरीच्या साह्याने दरीमध्ये उतरले. त्यांनी जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे घाटामध्ये वाहतूककोंडी आणि बघ्यांची गर्दी झाली होती.