ससूनमध्ये मातृ दुग्धपेढीची संजीवनी

By Admin | Updated: August 2, 2014 04:09 IST2014-08-02T04:09:28+5:302014-08-02T04:09:28+5:30

वेळेआधी जन्माला आलेले, कमी वजन असलेल्या नवजात अर्भकांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना विविध आजार होऊन दगावण्याचे प्रमाण अधिक आहे

Mother's milk company Sanjivani in Sassoon | ससूनमध्ये मातृ दुग्धपेढीची संजीवनी

ससूनमध्ये मातृ दुग्धपेढीची संजीवनी

पुणे : वेळेआधी जन्माला आलेले, कमी वजन असलेल्या नवजात अर्भकांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना विविध आजार होऊन दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. पण अशा नवजात अर्भकांना ससून रुग्णालयातील मातृ दुग्धपेढीने संजीवनी दिली आहे. ससूनच्या नवजात अतिदक्षता विभागातील अशा अर्भकांना डब्याच्या दुधाऐवजी दुसऱ्या मातेचेच दूध देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढून ती लवकर बरी होऊन घरी जाऊ लागली आहेत.
ससून रुग्णालयात नोव्हेंबर २०१३ मध्ये मातृ दुग्धपेढी सुरू करण्यात आली. राज्यात अशी दुग्धपेढी सुरू करणारे हे दुसरेच शासकीय रुग्णालय आहे. सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८ महिन्यांत या पेढीमध्ये सुमारे २ हजार एमएल दूध जमा झाले. विशेष म्हणजे, या पेढीत मातांनी दिलेले दूध ६ महिन्यांपर्यंत साठविण्याची क्षमता आहे. पण तिथे दाखल असलेल्या अर्भकांना दुधाची आवश्यकता असल्याने अवघ्या अवघ्या २ दिवसांमध्येच जमा झालेले दूध संपत आहे.
याबाबत ससूनच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या खडसे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या, मातृ दुग्धपेढी सुरू करणारे मुंबईतील जे. जे. सरकारी रुग्णालयानंतर ससून हे दुसरे सरकारी रुग्णालय आहे. आठ महिन्यांत या पेढीत सुमारे २ हजार एमएल दूध जमा झाले आहे. दररोज ८ ते १० माता या पेढीत येऊन दूध देत आहेत. हे प्रमाण पेढी सुरू झाली तेव्हा २ ते ३ एवढे होते. पण जनजागृती आणि समुपदेशनामुळे अवघ्या ८ महिन्यांत हे प्रमाण वेगाने वाढले आहे. ससूनचा बालरोग विभाग व एनआयसीयूमध्ये दररोज सुमारे ५५ बालके दाखल होतात. दररोज येणारे दूध या बालकांना दिले जात आहे. त्यांना तेवढी आवश्यकता असल्याने अजून आम्हाला बाहेर दूध पाठवता येत नाही.
वेळेअगोदर जन्माला येणाऱ्या, कमी वजनाच्या बाळांना याअगोदर परिचारिका डब्यातील दूध देत असत. पण आता या
बाळांना दुग्धपेढीतील दूध देण्यात येत असल्याने त्यांची प्रतिकारक्षमता वाढून बाळ लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Mother's milk company Sanjivani in Sassoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.