मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान!
By Admin | Updated: September 30, 2015 01:09 IST2015-09-30T01:09:16+5:302015-09-30T01:09:16+5:30
पुणे-नाशिक मार्गावर भोसरी ते नाशिक फाटा फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल झाल्यापासून ही संख्या आणखीनच रोडावली आहे

मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान!
नितीन शिंदे, भोसरी
पुणे-नाशिक मार्गावर भोसरी ते नाशिक फाटा फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल झाल्यापासून ही संख्या आणखीनच रोडावली आहे. पहाटेपासून या पुलावरून चालणाऱ्यांची गर्दी असते. रस्त्याच्या कडेला असणारे दिवे अनेक वेळा बंद असतात. पहाटेचा अंधार व रस्त्याने उलट्या दिशेने चालत जाणारे नागरिक यांमुळे वाहनचालकांची मोठी कसरत होत असून, पहाटेचा मॉर्निंग वॉक करताना एका महिलेच्या जिवावर बेतले असते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने काही दुर्घटना घडली नाही.
चार-पाच दिवसांपूर्वी पहाटे फिरायला जाणारी एक व्यक्ती बसला आडवी आली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकावर घातली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शिवाय, या बसचालकाला मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकाने बस व्यवस्थित चालवायला येत नाही का, असे सुनावले. यामध्ये बसमध्ये असलेल्या एका महिलेला डोक्याला थोडा मार लागला. अपघाताचे गांभीर्य अपघातातील व्यक्ती आपल्याशी निगडित असेल, तरच कळत असते.
या रस्त्याला दोन्ही बाजूला दिवे आहेत, मात्र ते सुरू नाहीत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ नाहीत. हा मॉर्निंग वॉक जीवघेणा ठरू नये, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. रस्त्याच्या उलट्या बाजूने जाण्याचे टाळणे गरजेचे आहे. सध्या पाऊस नसल्याने फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत फिरायला येत आहेत. भोसरीत सध्या फिरायला येणे ही एक फॅशन होऊन बसली आहे. व्यायाम करण्यास कोणाला विरोध असण्याचे काही कारण नाही.
-----------
४पहाटेच्या वेळी वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना जरा सावधान, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
४पुणे- नाशिक महामार्ग अत्यंत रहदारीचा म्हणून ओळखला जातो. त्यातच नाशिक फाटा ते भोसरी या दरम्यान वाहनांची जास्तच वर्दळ असते. पहाटेच्या वेळी फिरायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भोसरी उड्डाणपुलावर पहाटेच्या वेळी फिरायला जाणे, ही फॅशन झाली आहे.
४रात्रीच्या वेळेस व पहाटेपासून सकाळी सातपर्यंत राजमाता उड्डाणपुलावरून उलट्या बाजूने फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा भाग तसा निर्मनुष्यच. त्यामुळे संख्या वाढत आहे.