राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST2021-07-09T04:08:39+5:302021-07-09T04:08:39+5:30

पुणे : बंगालच्या उपसागरावरून कमी उंचीवरून बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, अरबी समुद्रावरूनही येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर वाढला ...

Monsoon reactivated in the state | राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय

राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय

पुणे : बंगालच्या उपसागरावरून कमी उंचीवरून बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, अरबी समुद्रावरूनही येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

येत्या २४ तासांत मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १० जुलैपासून राज्यातील पाऊसमान वाढण्याची चिन्हे आहेत. येत्या १० ते १२ जुलै दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच १२ जुलैला कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यांत ‘ऑरेंट अलर्ट’ दिला असून घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत रामेश्वरी ९०, राजापूर ८०, अलिबाग, दापोली, कणकवली, खालापूर, कुडाळ, मंडणगड, मुरुड ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, करमाळा, लोणावळा येथे ३० मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यातील धर्माबाद, किनवट, मुदखेड या ठिकाणी ७०, बिलोली, कंधार, निलंगा येथे ५० तर आंबेजोगाई, बदनापूर, हदगाव, लातूर, नायगाव, खैरगाव, नांदेड, उमारीत ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला.

विदर्भात देसाईगंज येथे १२० मिलिमीटर पाऊस कोसळला. अर्जुनी मोरगाव, देवरी, कुरखेडा, मोहाडी, भामपुरी, गोंदिया, गोरेगाव, नागभीर, सडक अर्जुनी येथेही चाळीस मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. विदर्भात गुरुवारी दिवसभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा - नागपूर ९९, गोंदिया ७४, वर्धा २१, चंद्रपूर १२, अकोला ३ अ मुंबई ८ सांताक्रूझ १७, अलिबाग २, रत्नागिरी १३, पणजी १३, डहाणू १२, महाबळेश्वर ९, पुणे ३, सातारा ६.

Web Title: Monsoon reactivated in the state