शिर्सुफळ गावातील माकडांची होतेय उपासमार
By Admin | Updated: February 13, 2017 01:31 IST2017-02-13T01:31:53+5:302017-02-13T01:31:53+5:30
माकडांना देव मानणाऱ्या शिर्सुफळ (ता. बारामती) गावातील माकडांची संख्या कमी होत आहे. शिरसाई देवी परिसरात आणि संपूर्ण गावात

शिर्सुफळ गावातील माकडांची होतेय उपासमार
महेंद्र कांबळे / बारामती
माकडांना देव मानणाऱ्या शिर्सुफळ (ता. बारामती) गावातील माकडांची संख्या कमी होत आहे. शिरसाई देवी परिसरात आणि संपूर्ण गावात या माकडांचा वावर असतो. या माकडांसाठी इंग्रजांनी खास ‘माकड इनाम’ म्हणून शेतजमीन इनामी दिली आहे. मात्र या माकडांच्या मालकीच्या जमिनीत पीक घेतले जात नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. अलीकडच्या काळात माकडांची संख्या घटत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
ग्रामस्थांचा समावेश करून एकाच ट्रस्टच्या माध्यमातून देवस्थान आणि माकड इनामाच्या शेतजमिनीची देखभाल करावी, यासाठी ग्रामस्थांचा आग्रह आहे. ग्रामस्थांच्या देखरेखीखाली शिरसाई मंदिराच्या ट्रस्टचे दैनंदिन कामकाज चालते. इंग्रजांनी सनदेच्या माध्यमातून मंदिर परिसरातील माकडांची उपासमार होऊ नये, यासाठी शेतजमीन दिली आहे. मंदिराच्या ट्रस्टमध्ये ग्रामस्थांचा सहभाग आहे. तर शेतजमिनीच्या ट्रस्टमध्ये एकाच कुटुंबाचा समावेश आहे. त्याला ग्रामस्थांनी आव्हान दिले आहे. धर्मादाय आयुक्तांकडे याबाबतचे प्रकरण प्रलंबित आहे.
जुन्या ट्रस्टमध्ये एकाच कुटुंबाचा समावेश...
शिरसाई देवस्थान हे महाराष्ट्रातील पुरातन व नावाजलेले मंदिर आहे. शिरसाई देवस्थानच्या जमिनीचा ट्रस्ट हा सन १९५२मध्ये गुरव कुटुंबातील घरातील व्यक्तींचा तयार करण्यात आला. १९८०मध्ये जुन्याच ट्रस्टमध्ये मंदिराचा समावेश करण्यात आला. हा ट्रस्ट करताना तो वंशपरंपरागत करण्यात आला आहे. त्यामध्ये घरातील व्यक्तींचाच समावेश आहे. ट्रस्ट करत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. गावात तीन जमिनी इनाम ब्रिटिशकाळात देण्यात आल्या आहेत.
या जमिनीच्या ट्रस्टबाबत ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. त्यावर निर्णय प्रलंबित आहे. ग्रामस्थ आणि मंदिराची देखभाल करणारे कुटुंब माकडांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवतात. या मंदिरात हजारो भाविक सातत्याने येत असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनदेखील माकडांना खाद्य पुरविले जाते.
तसेच, यात्रा, उत्सवकाळात ग्रामस्थांकडूनच मंदिराची देखभाल केली जाते. मात्र, ट्रस्टकडून धर्मादाय आयुक्तांकडे चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
विशेष म्हणजे ट्रस्टच्या विश्वस्तांकडून ग्रामस्थांना पूजेचा अधिकार कधीही देण्यात आला
नाही. सध्या ट्रस्टवर जे विश्वस्त आहेत, ते पुणे, सासवड, जेजुरी, बारामती, दौंड या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मुख्य विश्वस्त विनोद महादेव शिंदे (गुरव) हे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात. त्यामुळे त्यांचा दैनंदिन देवस्थानशी संपर्क येत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.