मोदी व पवार यांचा बारामतीत ‘व्हॅलेंटाईन डे’
By Admin | Updated: January 21, 2015 23:04 IST2015-01-21T23:04:58+5:302015-01-21T23:04:58+5:30
चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, असे जहाल वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीतच शरद पवार, अजित पवार यांच्यावर हल्ला चढविला होता.

मोदी व पवार यांचा बारामतीत ‘व्हॅलेंटाईन डे’
बारामती : विधानसभेच्या निवडणुकीत पवार चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, असे जहाल वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीतच शरद पवार, अजित पवार यांच्यावर हल्ला चढविला होता. मात्र, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. याचाच प्रत्यय येणार आहे. निमित्त आहे, पंतप्रधानांचा बारामतीतील नियोजित दौरा. तोही शरद पवार अध्यक्ष असलेल्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारलेल्या विविध इमारतींचे उद्घाटन. जागतिक स्तरावर १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. त्याच दिवशी पवार - मोदी यांचे राजकीय मनोमिलन होण्याची शक्यता आहे.
कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून बांधण्यात आलेले दिनकर सभागृह, शेतकरी निवास आणि सेंटर फॉर एक्सलन्स या नव्या इमारतींचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्याचा मानस आहे. यासाठी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत कृषी विकास प्रतिष्ठान येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी या बैठकीत माहिती दिल्यानुसार, दि. १४ फेब्रुवारीला मोदी यांचा दौरा निश्चित झाला आहे.
या दौऱ्याच्या निमित्ताने मोदींच्या समोर बारामतीचा विकासाचा आढावाच घेतला जाणार असून विधानसभेच्या प्रचारात मोदींनी केलेला आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे काय, अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)