सेंद्रिय शेतीच्या जोरावर आधुनिक शेती
By Admin | Updated: May 11, 2016 00:45 IST2016-05-11T00:45:32+5:302016-05-11T00:45:32+5:30
निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे

सेंद्रिय शेतीच्या जोरावर आधुनिक शेती
खोडद : निसर्गचक्राच्या कचाट्यातून शेतीला वाचविण्यासाठी आता रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागला आहे. हिवरेतर्फे नारायणगाव येथील अवधूत दत्तात्रय बारवे व अभिजित दत्तात्रय बारवे या बंधूंनी तीन एकर क्षेत्रात तैवान पपईचे सेंद्रिय पद्धतीने भरघोस पीक घेतले आहे. विशेष म्हणजे या तीन एकरपैकी एक एकर क्षेत्रात पपई व डाळिंब अशी दोन्ही पिके एकत्रित घेतली आहेत.
अवधूत व अभिजित बारवे यांनी तैवान पपईची एक एकरात ११०० रोपांची अशी तीन एकर क्षेत्रात ३ हजार ३०० रोपे १० महिन्यांपूर्वी लावली होती. सध्या पपईच्या फळांची तोडणी सुरू आहे. तीन एकर क्षेत्रात ६ फूट बाय ५ फूट अशा अंतरावर बेडवर ही लागवड केली आहे. मल्चिंग पेपर व ठिबकचा वापर केला आहे. सुरुवातीला बेसल डोस दिला असून, अन्य कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. तीन एकर क्षेत्रात २ ट्रक शेणखत टाकले आहे. सेंद्रिय पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला सुमारे ३० ते ४० किलो माल निघतो, तर रासायनिक पद्धतीने केलेल्या पपईच्या एका झाडाला ७० ते ८० किलो माल निघतो. सेंद्रिय पपईला किलोला २५ ते २६ रुपये बाजारभाव मिळतो, तर सेंद्रिय पपईला किलोला १५ ते १६ रुपये बाजारभाव मिळतो.
‘पपईच्या रोपांची खरेदी, शेणखत, बेसल, ठिबक, मल्चिंग पेपर आणि मजुरी असा मिळून एकरी ८८ हजार रुपये खर्च आला आहे. रोपांची लागवड केल्यापासून १० महिन्यांत फळे तोडणीसाठी येतात. एवढ्याच क्षेत्रात रासायनिक खतांचा वापर केला असता तर सुमारे २३० टन माल निघाला. मात्र, पूर्ण क्षेत्रात सेंद्रिय पद्धत वापरल्यामुळे सुमारे ९० टन माल निघणार आहे.