रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:56+5:302021-06-16T04:13:56+5:30
बारामती : माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ...

रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का
बारामती : माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर बारामती पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या प्रकरणाचा तपास करून मोक्कांतर्गत कारवाई केल्याची ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे बारामतीतील संघटित गुन्हेगारीस आळा बसण्यास मदत होणार आहे.
याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १५) अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माळेगाव येथील संभाजीनगरमध्ये दिनांक ३१ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रविराज तावरे हे पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासोबत संभाजीनगर येथे स्वत:च्या मोटारीतून गेले होते. तेथे वडापाव घेत त्यांनी वडापाव विक्रेत्याला पैसे दिले. चारचाकीकडे येत असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रविराज यांच्या छातीत घुसली होती. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी फिर्याद दिली होती. जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी केलेल्या विकासकामांच्या रोषातून तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी धमकावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. तसेच राजकीय व आर्थिक फायदा मिळवण्याच्या हेतूने रविराज तावरे यांना संपवून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. आरोपींनी हत्येचा कट रचून अल्पवयीन मुलामार्फत गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणातील आरोपींवर या आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, असे संघटितपणे केलेले ९ गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत.
प्रशांत पोपटराव मोरे (वय ४७, रा. माळेगाव कारखाना, शिवनगर, ता. बारामती), विनोद ऊर्फ टॉम पोपटराव मोरे, राहुल ऊर्फ रिबल कृष्णांंत यादव मोरे व एक अल्पवयीन अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रशांत मोरे याच्यावर ९, आरोपी विनोद ऊर्फ टॉम मोरे याच्या वर ७, आरोपी राहुल ऊर्फ रिबल मोरे याच्यावर २ तर, अल्पवयीनवर १ गुन्हा दाखल आहे. गोळीबार प्रकरण हे संघटितपणे गंभीर हिंसाचार करून त्यात घातक शास्त्राचा वापर करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांचे वाढीव कलम लावण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता.
----------------------------
पोलीस राबवणार मिशन माळेगाव ऑपरेशन...
माळेगावमधील लहान-मोठे गुन्हेगार, येथे चालणारे अवैध व्यावसाय यांची माहिती काढण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या काळात नगरपंचायतीची निवडणूक लक्षात घेता येथे अवैध धंदे करणारे, खासगी सावकारी करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे यांच्यावर पोलिसांकडून आक्रमकपणे कारवाई करण्यात येईल. फक्त गुन्हेगारी संपवणार नाही आहोत, तर माळेगावच्या पोलीस ठाण्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात येणार आहेत. पूर्वीप्रमाणे माळेगावमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करणार आहे.
-मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती
------------------------------------