आठवीपासून मुलांमध्ये मोबाईलचं वेड
By Admin | Updated: February 14, 2017 01:34 IST2017-02-14T01:34:44+5:302017-02-14T01:34:44+5:30
मोबाईलच्या वाढत्या प्रसारामध्ये केवळ तरुणाईच नव्हे, तर आता शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. इयत्ता आठवीपासून

आठवीपासून मुलांमध्ये मोबाईलचं वेड
प्रशांत ननवरे / बारामती
मोबाईलच्या वाढत्या प्रसारामध्ये केवळ तरुणाईच नव्हे, तर आता शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. इयत्ता आठवीपासून महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या दिसून येत आहेत. सोशल मीडियाचे संदेश सतत तपासणे, सातत्याने मोबाईल वापर, कुटुंबीयांशी संवाद न साधणे, खेळ, मित्रांपासून दूर राहणे, अभ्यास, गुणवत्तेवर परिणाम होणे, विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड जाणवणे, टोकाची भूमिका घेणे, रागीट स्वभाव, नैराश्य, आॅनलाईन खरेदीचे व्यसन या विद्यार्थ्यांच्या आदी सवयीमुळे पालकवर्ग त्रस्त होऊ लागला आहे.
मोबाईल, इंटरनेटचा विद्यार्थी जीवनावर गंभीर परिणाम जाणवू लागला आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांभोवती हा विळखा घट्ट होत आहे. मोबाईल वापर सवयीच्या आधीन झालेले विद्यार्थी पालकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. मोबाईलच्या अतिवापरापासून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेण्याची वेळ आली आहे, तर अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याने याबाबत मानसोपचारतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक जीवनाची व्याख्या चांगलीच बदलली आहे. त्यामध्ये मोबाईल, इंटरनेटचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटेदेखील आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर हे तोटे आता पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे पालकवर्गाची झोप उडाली आहे. दारू, सिगारेटच्या व्यसनाप्रमाणे इंटरनेट आणि मोबाईलचे व्यसन विद्यार्थ्यांना लागते आहे. येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा पवार-घालमे यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले, की शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ‘इंटरनेट अॅडिक्शन डिसआॅर्डर’ या आजाराचे प्रमाण वाढत आहे. वारंवार मोबाईल पाहणे, सोशल मीडियावर सतत व्यस्त असणे ही लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरल्याची पालकांची तक्रार आहे. कुटुंबाशी असलेला संवादच हरविल्याचे वास्तव आहे.
अनेक आई-वडील, पालक प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट फोन मुलांना देतात. मात्र, दुर्दैवाने याचा गैरवापर होत आहे. पूर्वीच्या काळात मोबाईल अस्तित्वात नव्हते. कोणत्याही कार्यक्रमात त्यामुळे आई-वडिलांबरोबर गेलेली मुले निरीक्षण करीत असत. आपली परंपरा, संस्कृती, नात्यांची व्याख्या या निरीक्षणातून मुलांच्या मनावर नकळत बिंबवली जात असे. मात्र, आता तेच चित्र बदलले आहे. कुटुंबातील प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतला आहे. सार्वजनिकसह कोणत्याही ठिकाणी मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. सर्वत्र हे चित्र प्रकर्षाने जाणवते. मोबाईलमध्ये काही बौद्धिक चालना देणाऱ्या ‘गेम्स’ उपयुक्त आहेत. मात्र, मारामारी, शूटिंग या गेम्सचा ठराविक वापर आवश्यक आहे. अतिवापर चांगला नाही. आपण मुलांना टेक्नोसॅव्ही होण्यापासून कोणी रोखू शक त नाही. मात्र, मुले गरजेपुरता वापर करतील, याची दक्षता घ्यावी. इंटरनेटवर विद्यार्थ्यांचे प्रोजेक्टचेदेखील काम चालते. त्याचा वापर थांबवू शकत नाही. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. त्यांच्याशी संवाद साधावा. विद्यार्थ्यांचे चांगल्या बाबींकडे मन वळवावे. भवितव्यासाठी उपयुक्त गोष्टींमध्ये मन गुंतण्यासाठी लक्ष द्यावे. क्रीडा, प्रभावी वैचारिक वाचनाकडे विद्यार्थ्यांना वळवावे.