घराची काच फोडण्याच्या कारणावरून टोळक्याची दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST2021-04-15T04:11:01+5:302021-04-15T04:11:01+5:30
पुणे : तू आमच्या घराची काच का फोडली? अशी विचारणा करून टोळक्याने दोघांना मारहाण केली. सोमवारी (दि.१२) तळजाई पठार ...

घराची काच फोडण्याच्या कारणावरून टोळक्याची दोघांना मारहाण
पुणे : तू आमच्या घराची काच का फोडली? अशी विचारणा करून टोळक्याने दोघांना मारहाण केली. सोमवारी (दि.१२) तळजाई पठार परिसरात दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत पार्थ कदम (वय २०, रा. साईदत्तनगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक मुख्य आरोपीसह त्याच्या दहा ते बारा मित्राांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी फिर्यादी आणि त्याचा मित्र तळजाई पठार परिसरातून निघाले होते. त्या वेळी पार्थ कदमच्या ओळखीतील एक जण दहा ते बारा जणांना घेऊन थांबला होता. ‘तू आमच्या घराची काच का फोडली? अशी विचारणा त्यांनी पार्थ याच्याकडे केली. मी घराची काच फोडली? नाही, असे पार्थ याने आरोपीला सांगितले. तेवढ्यात आरोपी आणि त्याचा मित्रांनी पार्थ आणि त्याच्या मित्रास काठीने व विटाने मारहाण केली. तसेच तेथे जमलेल्या लोकांना शिवीगाळ करून कोणी आमच्या भांडणामध्ये आलात तर तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी विटांचे तुकडे घटनास्थळी जमा झालेले नागरिक, घर आणि दुकानांवर फेकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे करीत आहेत.