मनसेने परप्रांतीयांबाबत भूमिका स्पष्ट करावी मगच युतीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:38+5:302021-01-08T04:32:38+5:30
पुणे : जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही, तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी ...

मनसेने परप्रांतीयांबाबत भूमिका स्पष्ट करावी मगच युतीची चर्चा
पुणे : जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही, तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी माणसे राहतात. त्यांना अशी वागणूक मिळत नाही. मनसेचा नेमका कशाला विरोध आहे हे कळत नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील विविध प्रश्नांबाबत पाटील यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेटून घेऊन चर्चा केली. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. या विषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविलेले आक्रमकांचे पुतळे हटविलेले आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पालिकेत ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल. नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट असल्याचे पाटील म्हणाले.