मनसेने सदस्यपदाच्या दोन्ही जागा गमाविल्या
By Admin | Updated: May 21, 2015 01:40 IST2015-05-21T01:40:33+5:302015-05-21T01:40:33+5:30
महापालिकेच्या विधी समिती व शहर सुधारणा समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नशिबाने मिळालेल्या सदस्यपदाच्या दोन जागा गमाविल्या आहेत.

मनसेने सदस्यपदाच्या दोन्ही जागा गमाविल्या
पुणे : महापालिकेच्या विधी समिती व शहर सुधारणा समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नशिबाने मिळालेल्या सदस्यपदाच्या दोन जागा गमाविल्या आहेत. या जागांवर काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून आघाडी तुटलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुन्हा एकत्र आले आहेत.
विविध समित्यांवरील सदस्यपदाची निवड पक्षीय बलानुसार केली गेली. मात्र, काँग्रेस व मनसेचे सभागृहातील सदस्य समान असल्याने समितीच्या एका सदस्यासाठी निवडणूक घ्यावी लागणार होती. मात्र, काँग्रेसने मनसेचे सदस्य निवडण्यास मंजुरी दिली. त्या वेळी स्वीकृत सदस्य बाळा शेडगे यांची विधी समिती व शहर सुधारणा समितीवर निवड केली होती. मनसेतून शेडगे यांच्या निवडीला जोरदार विरोध झाल्याने त्यांनी महापौरांकडे समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन पदांसाठी बुधवारी निवडणूक झाली.
विधी समितीसाठी मनसेकडून युंगधरा चाकणकर, तर काँग्रेसकडून सुनंदा गडाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नुकतेच प्रभाग समितीमधील स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही युती नसल्याचे मनसेने जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेस आणि मनसेचे उमेदवार असल्याने राष्ट्रवादी कोणाला मतदान करणार याबाबत उत्सुकता होती.
४मनसेने साथ सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना व भाजपाचे सदस्य या निवडणुकीत तटस्थ राहिले. सुनंदा गडाळे यांना ४६, तर युंगधरा चाकणकर यांना २० मते पडली. गडाळे या २६ मतांनी निवडून आल्या.
४त्यानंतर शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदासाठी काँग्रेसकडून दत्ता बहिरट व मनसेकडून अस्मिता शिंदे यांनी अर्ज दाखल केले. बहिरट यांना ४८,तर शिंदे यांना २१ मते पडली. बहिरट हे २७ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी व काँग्रेसने गळयात गळे घातल्यामुळे मनसे एकाकी पडली.