आमदारांनी घेतली झाडाझडती

By Admin | Updated: October 10, 2015 05:19 IST2015-10-10T05:19:37+5:302015-10-10T05:19:37+5:30

पुण्यातील एसटी स्थानकांवर ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’ची दखल घेऊन शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी अचानक एसटी स्थानकाची पाहणी

MLAs took the bushes | आमदारांनी घेतली झाडाझडती

आमदारांनी घेतली झाडाझडती

पुणे : पुण्यातील एसटी स्थानकांवर ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’ची दखल घेऊन शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी अचानक एसटी स्थानकाची पाहणी केली असता अनागोंदी कारभार उघड झाला. वेगवेगळ्या खासगी ठेकेदारांकडे सोपविलेल्या सेवांमध्ये कोणतीही सुसूत्रता नसल्याने प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांनाही सुविधाच मिळत नसल्याचे या वेळी उघडकीस आले.
आज सकाळी आमदार काळे यांनी शिवाजीनगर एसटी स्थानकाला भेट दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव सोबत होते. येथील पाण्याची टाकी म्हणजे तळीरामांचा अड्डा बनल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या व इतर कचरा यासंबंधी आगार व्यवस्थापक आर. डी. शेलोत यांना विचारणा करण्यात आली असता त्यासंबंधी त्यांच्याकडे कोणतीही ठोस उत्तरे नव्हती. या वेळी वाहतूक नियंत्रक एस. एन. जोशीही उपस्थित होते.
स्थानकामध्ये ये-जा करण्यासाठी प्रवेशव्दाराशिवाय इतरही ठिकाणे आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; पण त्यांची तोंडे वेगळ्याच दिशेला असल्याने निरुपयोगी आहेत. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खोल्या अस्वच्छ आहेत, यामधून स्थानक प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला असून त्यावर त्वरीत कार्यवाही व्हावी असे काळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

ठेकेदाराला दरमहा पैसे; स्वच्छता मात्र गायब
एसटी चालक व वाहक यांच्यासाठी आगारात स्वतंत्र कक्ष असून, त्या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ठेकेदाराला दरमहा ६० हजार रुपये देण्यात येतात. मात्र, या ठिकाणी अजिबात स्वच्छता नसून तेथील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाल्याचे अनेक चालकांनी सांगितले. या ठिकाणी सुरक्षेचीही योग्य ती व्यवस्था नसून चालक व वाहकांचे मोबाईल, बॅग चोरीला जात असल्याची परिस्थिती आहे.

स्थानकाच्या वर्कशॉपमध्ये गुडघ्याइतके पाणी साठत असल्याची तक्रार एका कर्मचाऱ्याने केली. त्याबाबत माहिती घेतली असता स्थानकात असणाऱ्या विहिरीच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी पाणी साठत असल्याचे लक्षात आले. त्या वेळी आमदार काळे यांनी महापालिकेशी संपर्क साधत शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या विहिरीतील पाणी वापरावे, असे सांगितले.
त्यानुसार या पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अडारी यांनी सांगितले.

स्थानकात येण्या-जाण्यासाठी दोन मुख्य प्रवेश असताना इतर ठिकाणहून नागरिक ये-जा करत असतात. अशा वेळी कोणती अघटित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा जाब आमदारांनी आगार व्यवस्थापकांना विचारला. याशिवाय इतर माहिती घेतली.
दोन दिवसांत स्थानकाची सुरक्षा व स्वच्छता याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे सांगितले. आमदार काळे येत्या सोमवारी सर्व गोष्टी सांगितल्याप्रमाणे झाल्या की नाही याची पाहणी करण्यासाठी पुन्हा जाणार आहेत.

शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या विविध व्यवस्था सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. ज्या ठेकेदारांकडून स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पद्धतीने काम केले जात नाही, त्याबाबतीत विशेष लक्ष पुरवणार आहे.
- आर. डी. शेलोत, आगार व्यवस्थापक

Web Title: MLAs took the bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.