आमदारांनी केली पक्षकार्यकर्त्यांना दमबाजी
By Admin | Updated: January 26, 2015 01:20 IST2015-01-26T01:20:44+5:302015-01-26T01:20:44+5:30
कोणाला विचारून तुम्ही उपोषणाला बसलात? पक्ष काय तुमच्या बापाचा आहे काय रे? फटकून काढीन! स्वत:ला काय समजता?

आमदारांनी केली पक्षकार्यकर्त्यांना दमबाजी
जुन्नर : कोणाला विचारून तुम्ही उपोषणाला बसलात? पक्ष काय तुमच्या बापाचा आहे काय रे? फटकून काढीन! स्वत:ला काय समजता? चला तेथून चालू पडा, तुम्हाला आमदार खेळणे वाटले काय? अशा भाषेत एका पक्षाच्या आमदाराने आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोबाईलवरून दमबाजी करण्याचा प्रकार नुकताच घडला असून, या घटनेमुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
त्यांच्या या दमबाजीचे व्हाईस रेकॉर्डिंग सध्या व्हॉट्स अॅपवर फिरत असून, याबाबत जोरदार उलटसुलट चर्चा होत आहे. आपला माणूस साधा माणूस, असे जनतेला सांगून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे महाशय निवडून आले आहेत.
या आमदार साहेबांच्या मतदारसंघातील एका गावातील समाजमंदिराची जागा पाडण्यात आल्याने स्थानिक काही कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी याबाबत संबंधित विभागाकडे दादही मागितली होती. मात्र, अधिकारी दाद देत नसल्याने त्यांनी तालुक्याच्या गावी उपोषणाचा निर्णय घेतला व काही कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले. उपोषणाला आपण का बसलोत, हे लोकांना समजावे म्हणून त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘दिलसे’ विचार करून पक्षाचा नावाचा फलकही लावला.
दरम्यान, उपोषणाची बातमी आमदार महोदयांच्या कानावर गेली आणि त्यांचे पित्तच खवळले. मी एकमेव पक्षाचा आमदार असताना मला न विचारता हे कार्यकर्ते उपोषणाला कसे बसू शकतात? मग काय या साहेबांनी खिशातून मोबाईल काढून लगेच उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना झापायला सुरुवात केली. वास्तविक साध्या व सोप्या भाषेतून कार्यकर्त्यांना समज देऊन उपोषण सोडायला ते भाग पाडू शकत होते. मात्र, तसे त्यांनी न करता कार्यकर्त्यांवर शब्दांची फायरिंग सुरू केली. (वार्ताहर)