‘एमआयटी’ने टेकडीलगत केलेला रस्ता पालिका उखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:31+5:302021-01-08T04:26:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूडमधील एमआयटी कॉलेजकडून टेकडीलगत बांधण्यात आलेला रस्ता पालिका प्रशासनाकडून काढण्यात येणार आहे. पालिका न्यायालयाने ...

MIT will uproot the road near the hill | ‘एमआयटी’ने टेकडीलगत केलेला रस्ता पालिका उखडणार

‘एमआयटी’ने टेकडीलगत केलेला रस्ता पालिका उखडणार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोथरूडमधील एमआयटी कॉलेजकडून टेकडीलगत बांधण्यात आलेला रस्ता पालिका प्रशासनाकडून काढण्यात येणार आहे. पालिका न्यायालयाने एमआयटी महाविद्यालयाला दणका देत कारवाईवरील स्थगिती उठविली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी (दि. ४) देण्यात आल्याची माहिती मुख्य विधी अधिकारी अ‍ॅड. मंजूषा इधाटे यांनी दिली.

‘एमआयटी’ला पालिका प्रशासनाने बेकायदा रस्ता बांधल्याप्रकरणी एमआरटीपी अ‍ॅक्टच्या कलम ५३ नुसार नोटीस बजावली होती. एमआयटीनेही याच कायद्याच्या कलम ४४ अंतर्गत रस्त्याला परवानगी मागितली होती. पालिकेने हा प्रस्ताव फेटाळला होता. न्यायालयात याबाबत दावा दाखल करण्यात आला. पालिका दाव्यात हजर झाली. दोन्ही पक्षांचे म्हणणे सादर करेपर्यंत दाव्याला स्थगिती देण्यात आली. पालिकेने या कारवाईविषयी लेखी म्हणणे दाखल केले.

पालिकेने युक्तिवाद दाखल केल्यानंतर, १ जानेवारीला पुन्हा सुनावणी झाली. त्या वेळी एमआयटीने आपला युक्तिवाद दाखल केला. न्यायालयाने दोन्ही युक्तिवाद ऐकल्यावर एमआयटीचा कारवाईला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळला. त्यामुळे पालिका आता कलम ५३ नुसार कारवाई करू शकते असेही इधाटे यांनी सांगितले. या प्रकरणाचे कामकाज पालिकेचे वकील अ‍ॅड. संजय मुरकुटे यांनी पाहिले.

चौकट

पालिकेकडे कलम ४४ अंतर्गत दाखल करण्यात आलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, त्यानंतर एमआयटीने राज्य शासनाकडे अपील दाखल केले आहे. हे अपील शासनाकडे प्रलंबित असल्याचे अ‍ॅड. इधाटे यांनी सांगितले.

Web Title: MIT will uproot the road near the hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.