पालिकेच्या मिळकतीच झाल्या बेपत्ता
By Admin | Updated: August 14, 2014 04:15 IST2014-08-14T04:15:45+5:302014-08-14T04:15:45+5:30
कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने बांधलेली समाजमंदिरे, महिला प्रशिक्षण केंद्रे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांसारख्या बांधीव मिळकतींचा हिशेब महापालिकेस मिळत नसल्याचे समोर आले आहे.

पालिकेच्या मिळकतीच झाल्या बेपत्ता
पुणे : कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने बांधलेली समाजमंदिरे, महिला प्रशिक्षण केंद्रे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांसारख्या बांधीव मिळकतींचा हिशेब महापालिकेस मिळत नसल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या इमारतींच्या गैरवापराबाबत तसेच त्यांचे वाटप करताना महापालिकेच्या नियमावलीचे पालन केले नसल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी ही माहिती क्षेत्रीय कार्यालयासह, भवन विभाग, नागरवस्ती विभाग तसेच भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागाने सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशास केराची टोपली दाखवीत कोणत्याही विभागप्रमुखांनी ही माहिती दिलेली नाही.
२००८ नंतर पालिकेने जागावाटप नियमावली करूनही त्यानुसार, या मिळकती दिल्या जात नाहीत, त्याचा वापर इतर कारणांसाठी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी ३ जुलै रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि भूसंपादन विभागाने १५ दिवसांच्या आत या मिळकतींची सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यास एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणत्याही विभागाने ही माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या मिळकती कोणाकडे आहेत. याचा कोणताही हिशेब पालिकेकडे नाही.
(प्रतिनिधी)