पुण्यात दिवाळीनिमित्त रेड्यांच्या वाजत गाजत मिरवणुका

By Admin | Updated: November 1, 2016 18:27 IST2016-11-01T18:27:31+5:302016-11-01T18:27:31+5:30

दिवाळीनिमित्त पशुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गवळी व्यावसायिकांनी मंगळवारी शहराच्या विविध भागातून गणेश पेठ दूध भट्टीपर्यंत रेड्यांच्या वाजत गाजत

Mirwaanuka roaming on the occasion of Diwali in Pune | पुण्यात दिवाळीनिमित्त रेड्यांच्या वाजत गाजत मिरवणुका

पुण्यात दिवाळीनिमित्त रेड्यांच्या वाजत गाजत मिरवणुका

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 01 - दिवाळीनिमित्त पशुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गवळी व्यावसायिकांनी मंगळवारी शहराच्या विविध भागातून गणेश पेठ दूध भट्टीपर्यंत रेड्यांच्या वाजत गाजत मिरवणुका काढल्या. रेड्यांचा सन्मान करण्याच्या या सणाला गवळी मंडळींमध्ये सगर असे संबोधन आहे. 
 शहराच्या पूर्व भागात. लष्कर परिसरात म्हशींचे आणि रेड्यांचे गोठे मोठ्या प्रमाणात आहेत. नेहमी गणेशपेठ दूध भट्टीत दूध घालण्यासाठी येणारे व्यावसायिक वर्गणी काढून हा सण दरवर्षी साजरा करतात. रेड्यांचा आणि त्यांच्या मालकांचा सत्कार गणेशपेठ दूध भट्टी येथील कार्यक्र मात केला जातो.
  या रेड्यांना सगरनिमित्त सकाळीच आंघोळ घालून, भादरुन, शिंगे रंगवून मिरवणुकीसाठी तयार करण्यात आले. लहानमोठ्या मिरवणुका काढत सजविलेल्या रेड्यांना नाना पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरुन दूध भट्टीपर्यंत नेण्यात आले. काही जणांनी ट्रकमधून रेड्यांना मिरवणुकीने आणले होते. फटाके वाजवून ढोल ताशांच्या निनादात काढल्या जाणा-या या मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 
  पूर्व भागातील मिरवणुकांमधील रेड्यांना जागोजागी असलेल्या देव, पीर यांच्यापुढे नतमस्तक होण्यास शिकविले जात होते. रेड्यांना मागील दोन पायांवर उभे करुन किंवा पुढचे दोन्ही पाय मुडपून देवापुढे नमविले जात होते. सकाळी ११ पासून सुरु झालेल्या मिरवणुका सायंकाळपर्यंत सुरु होत्या. दूधभट्टीजवळील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या ठिकाणी अनेक मिरवणुका एकत्र झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. रेड्यांना पितळेची साखळी घालून तर गोठेमालकांना केशरी फेटा घालून, श्रीफळ देऊन दूध भट्टीच्या पदाधिका-यांतर्फे गौरविण्यात आले.
  सतत सुरु असलेल्या मिरवणुकांमुळे नाना पेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. गोठामालक नितीन बीडकर म्हणाले, सगर सणाची प्रथा पारंपारिक आहे. दिवाळीतील भाऊबीजच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. वर्षभर रेड्यांना खाणे देऊन धष्टपुष्ट केले जातेच, आजच्या दिवशी त्यांना गोडधोड खाणे दिले जाते. मिरवणुकीत २५ हून अधिक रेडे सहभागी झाले असावेत असा अंदाज आहे.  

Web Title: Mirwaanuka roaming on the occasion of Diwali in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.