आईने घडविली लेक
By Admin | Updated: March 7, 2015 23:08 IST2015-03-07T23:08:12+5:302015-03-07T23:08:12+5:30
आपल्या सारखं जगणं मुलीच्या वाट्याला येऊ नये, तिन चांगलं शिकावं, मोठं व्हावं हा विचार उराशी बाळगून एका मातेने स्वत: खस्ता खात, शेतात काबडकष्ट करीत मुलीला शिकवले.

आईने घडविली लेक
घोडेगाव : आपल्या सारखं जगणं मुलीच्या वाट्याला येऊ नये, तिन चांगलं शिकावं, मोठं व्हावं हा विचार उराशी बाळगून एका मातेने स्वत: खस्ता खात, शेतात काबडकष्ट करीत मुलीला शिकवले. आणि बघता बघता या मायेची लेक डॉ. शकुंतला काळे राज्याच्या शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषदेची संचालिका झाली.
आपली आई लक्ष्मीबाई मोतीराम काळे हिच्या कष्टामुळे आपण या पदापर्यंत पोहोचले त्या आपल्या आईची ओळख शेवटपर्यंत राहावी म्हणून डॉ. शकुंतला काळे यांनी लग्नानंतरही आपले आडनाव ‘गावडे’ न बदलता ‘काळे’च ठेवले आहे, तर स्त्री-पुरूषामधील भेदभाव मिटावा, यासाठी आईला अग्निडाग त्यांनी स्वत: दिला. डॉ. शकुंतला काळे या सध्या राज्याच्या शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या संचालिका म्हणून पुण्यामध्ये काम पाहात आहेत. राज्यातील एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी संभाळताना आपण या पदापर्यंत ज्या आईमुळे पोहोचलो, त्या आईची आठवण त्यांना सदैव असते. डॉ. शकुंतला काळे या नऊ वर्षांच्या असताना त्यांचे पितृछत्र हरवले. लक्ष्मीबार्इंना ही एकुलती एक मुलगी आयुष्यातील जगण्याचा आशेचा किरण होता. या मातेने आपली जिरायती शेती कष्टाने करून कुटुंब चालवले. सन १९७८ मध्ये गिरवलीच्या पाझर तलावावर काम करून मुलीची दहावीची फी भरली. त्याच पैशात या आईने मुलीला परकर-पोलकं शिवलं व हेच परकर-पोलकं घालून शकुंतला काळे यांनी दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत त्या मुलींमध्ये पहिल्या आल्या. शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या निरक्षर मातेने आपल्यासारखं जगणं मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून स्वत: शेतात काबाडकष्ट करून मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. डॉ. शकुंतला काळे यांनीही आईचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यां समोर ठेवून शिक्षण घेतले. डी़ एड. पूर्ण झाल्यानंतर, घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. डॉ. काळे यांनी शिक्षिका म्हणून काम करता करता स्पर्धा परीक्षा दिल्या व सन १९९३ मध्ये अधिकारी झाल्या.
सोलापूर येथे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, एससीईआरटीच्या अधिव्याख्यात्या, पुणे महानगर पालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय सचिव, एससीईआरटीच्या सहसंचालिका असे शिक्षण क्षेत्रातील जबाबदारीचे पद त्यांनी भूषविले आहे.