फुकट पाण्यावर ‘मिनरल’चा धंदा

By Admin | Updated: March 23, 2016 00:47 IST2016-03-23T00:47:34+5:302016-03-23T00:47:34+5:30

मिनरल वॉटर कंपन्यांनी महापालिकेकडून व्यावसायिक दराने पाणी घेऊन त्यांची विक्री करणे अपेक्षित असताना शहरातील ८५ मिनरल वॉटर कंपन्यांनी फुकट पाणी घेऊन महापालिकेची फसवणूक चालविली

Mineral business on free water | फुकट पाण्यावर ‘मिनरल’चा धंदा

फुकट पाण्यावर ‘मिनरल’चा धंदा

पुणे : मिनरल वॉटर कंपन्यांनी महापालिकेकडून व्यावसायिक दराने पाणी घेऊन त्यांची विक्री करणे अपेक्षित असताना शहरातील ८५ मिनरल वॉटर कंपन्यांनी फुकट पाणी घेऊन महापालिकेची फसवणूक चालविली असल्याचा धक्कादायक प्रकार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी मंगळवारी उजेडात आणला.
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंगळवारी सिद्धार्थ धेंडे यांनी मिनरल वॉटर कंपन्यांची यादीच महापालिका प्रशासनाकडे सुपूर्त केली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. राज्यात तीव्र पाणीटंचाईची निर्माण झाल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात
येत आहे.


शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, बांधकामाचे पाणी बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाण्याचा गैरवापर सुरू असल्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे मिनरल वॉटरची विक्री करणाऱ्या कंपन्या चोरून कनेक्शन घेऊन, तसेच टँकर खरेदी करून पाण्याचा वापर करीत आहेत.


मिनरल वॉटर कंपन्यांनी ३३ रूपये दर हजार लिटर या व्यावसायिक दराने पाण्याची खरेदी करणे आवश्यक असताना त्यांच्याकडून धूळफेक केली जात आहे. यामुळे महापालिकेचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच ऐन पाणीटंचाईच्या काळात या कंपन्या शहरातील पाणी फुकटात घेऊन त्याची शहराबाहेर महाग दराने विक्री करीत आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला या कंपन्यांच्या प्रतापाची काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, ‘मिनरल वॉटर कंपन्यांची यादी रिपाइंच्या गटनेत्यांकडून मिळाली आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन चौकशी करण्यास सांगण्यात आले आहेत. यामध्ये दोषी आढळून आलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.’ (प्रतिनिधी)

Web Title: Mineral business on free water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.