रस्त्यांसाठीचे कोट्यवधी ‘खड्ड्यात’

By Admin | Updated: May 24, 2015 00:24 IST2015-05-24T00:24:56+5:302015-05-24T00:24:56+5:30

गेल्याच वर्षी रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असताना पुन्हा त्याच रस्त्यांवर खोदाईची कामे झाल्याने या रस्त्यावर ठिगळे लागली आहेत.

Millions of roads in the 'pothole' | रस्त्यांसाठीचे कोट्यवधी ‘खड्ड्यात’

रस्त्यांसाठीचे कोट्यवधी ‘खड्ड्यात’

पुणे : गेल्याच वर्षी रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असताना पुन्हा त्याच रस्त्यांवर खोदाईची कामे झाल्याने या रस्त्यावर ठिगळे लागली आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी रस्त्यांसाठी खर्च केलेले सुमारे २०० ते २५० कोटी रुपये वाया जाणार आहेत.
गेल्या पावसाळ्यात पुणे करांसाठी ‘खड्डेमुक्त’ रस्त्यांचा संकल्प महापालिकेने सोडला होता. त्यासाठी २०१४ च्या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणावर निधीचीही तरतूद करण्यात आली होती. यामध्ये अनेक रस्त्यांवर पुर्नडांबरीकरण करण्यात आले. काही रस्त्यांची कामे नव्याने करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षभरत ४जी केबल, महावितरणचे इन्फ्रा, गॅसवाहिनी तसेच खासगी कंपन्यांच्या केबलसाठी करण्यात आलेल्या खोदाईने या रस्त्यांवर सध्या सर्वत्र ठिगळांचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे शहराच्या प्रमुख भागांमधील जवळपास ६० ते ७० टक्के रस्त्यांवर कोठेही १० मीटर पेक्षा अधिक समतलता राहिलेली नाही. परिणामी, या रस्त्यांवर केलेला खर्चतर वाया गेलाच आहे. शिवाय; रस्त्यांवर समतलता नसल्याने पुणेकरांना पाठीचे आजार आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी (२०१३-१४) शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती. त्यामुळे प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेत. २०१४-१५ मध्ये रस्त्यांची हे दुरवस्था दूर करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण करणे तसेच आवश्यक ते रस्ते ओव्हले पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. निवडणुका जवळ आल्याने इच्छुकांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण करून घेतले.

४महापालिकेकडून डांबरीकरण करण्यात येणाऱ्या एका रस्त्याचे किमान आयुष्य ३ वर्षांचे असते. ३ वर्षांत तो कोठेही खोदला गेला नाही. तसेच तुलनेने वाहतूक कमी असेल तर तो ४ वर्षेही चालतो. मात्र, त्यास रस्त्याच्या कडेने, मध्यभागी अथवा, त्याला क्रॉसकट घेतला गेल्यास या रस्त्याचे आयुष्य एका झटक्यात ५० टक्क्यांनी घटते. रस्ता तयार करण्यासाठी भरलेली खडी या खोदाईमुळे हळूहळू सुटी होऊन, त्या ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर त्यावर पॅच मारून रस्ता पुर्ववत करण्यासाठीही खर्च केला जातो. मात्र, हे पॅच ३ ते ४ महिन्यांच्यावर टिकत नाहीत. त्यामुळे अवघ्या वर्षभरापूर्वी केलेला रस्ता एकदा खोदाई झाली, की पुढील वर्षी पुन्हा करावा लागतो. विशेष म्हणजे एका रस्त्यावर किती खर्च व्हावा, याला काही मर्यादाच नसल्याने एकाच रस्त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो.

४शहरात खासगी केबल कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या खोदाई एवढीच खोदाई विकास कामांच्या नावाखाली लोकप्रतिनिधींकडून केले जाते. त्याचे आर्थिक गणित गमतीशीर आहे. नगरसेवक पद हे ५ वर्षांसाठी असते. त्यामुळे पहिल्या वर्षी निवडून आल्यानंतर नागरिकांनी चांगली सुविधा देण्याच्या नावाखाली प्रभागातील सर्व रस्ते प्रथम तातडीने डांबरीकरण करून घेतले जातात. त्यानंतर प्रभागात जलवाहिन्या अपुऱ्या असल्याचा तसेच डे्रनेज लाईन पुरत नसल्याचा साक्षात्कार होऊन दुसऱ्या वर्षी हे रस्ते नवीन वाहिन्या टाकण्यासाठी खोदले जातात. नंतर तिसऱ्या वर्षी त्या ठिकाणी खोदाईमुळे रस्ता खराब झाल्याने त्यांचे पुन्हा नव्याने डांबरीकरण केले जाते. चौथ्या वर्षी रस्त्यावर मोठा खर्च होत असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर तो सिमेंटचा करण्यासाठी खर्च होतो. पुन्हा महापालिका निवडणूक असते. त्या ठिकाणी नवा नगरसेवक येते आणि पुन्हा रस्त्याचा पाच वर्षांचे नवीन गणित सुरू होते.

समतोल रस्ताच नाही
४शहरातील वाहतूकीसाठी तयार करण्यात आलेले रस्ते समतोल असणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघात, रस्त्यांवर पाणी न साठणे तसेच वाहनांचे आणि वाहन चालकांना शारीरिक नुकसान होण्याचा धोका कमी असतो. मात्र, गेल्या ६ महिन्यांत झालेल्या खोदाईने शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर सलग १० मीटर समतोल रस्ताच दिसून येत नाही. त्यात सहकारनगर, मध्यवर्ती पेठा, कोथरूड, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील अंतर्गत भाग, हडपसर, कोंढवा, कात्रज, तळजाई नगर रस्ता या परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर ज्या ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणी डांबर टाकून रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला आहे.

४महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात जवळपास २६३ किमोमीटरच्या रस्ते खोदाईस परवानगी दिली आहे. तर त्यासाठी प्रति रंनिग मिटर ५,५४७ रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र, एखाद्या रस्ता खोदल्यानंतर तो संपूर्ण रस्ताच पुढील वर्षी तयार करावा लागत असल्याने पालिकेस मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी आहे. तर गेल्या वर्षभरात पालिकेने ३४ किमी रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण, ५२ किमीचे नवीन रस्ते, केले असून त्यातील जवळपास ७० टक्क्याहून अधिक रस्त्यांवर या वर्षी खोदाई झालेली आहे.

Web Title: Millions of roads in the 'pothole'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.