डांबरीकरणासाठी झाला कोट्यवधींचा धुरळा
By Admin | Updated: December 15, 2014 01:57 IST2014-12-15T01:57:52+5:302014-12-15T01:57:52+5:30
पावसाळयाच्या तोंडावर डांबरीकरणाची कामे नकोत, म्हणुन प्रलंबित ठेवलेली डांबरीकरणाची कामे महापालिकेने सुरू केली आहेत.

डांबरीकरणासाठी झाला कोट्यवधींचा धुरळा
पिंपरी : पावसाळयाच्या तोंडावर डांबरीकरणाची कामे नकोत, म्हणुन प्रलंबित ठेवलेली डांबरीकरणाची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. विविध भागात एकाचवेळी डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. पावसाळा संपल्यानंतर सुरू केलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा अवकाळी पावसामुळे चव्हाट्यावर येण्यास मदत झाली आहे.
पाच कोटींची रस्ते दुरुस्तीची
विविध भागांत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी स्थायी समिती सभेने यापुर्वीच सुमारे पाच कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यामध्ये वाकड रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण (७४ लाख रुपये), ताथवडे लक्ष्मीनगर, गणेशनगर पंडित पेट्रोल पंपाजवळील, नेवाळेवस्ती रस्त्यांचे डांबरीकरण (३० लाख ८० हजार), थेरगावमधील विविध रस्त्यांचे डांबरीकरण (९७ लाख), पुनावळे गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण (३० लाख ८० हजार), ताथवडे (३० लाख ८० हजार), वाकड रस्त्यांचे डांबरीकरण (७४ लाख ६९ हजार), थेरगाव परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण (२७ लाख ८० हजार), प्रभाग क्र ४९ मधील पवारनगर भागातील रस्त्यांचे डांबरीकरण ( २७ लाख ७७ हजार), भाटनगर परिसरातील रस्त्यांसाठी (४१ लाख) गणेशनगर व मंगलनगरमधील डांबरीकरणासाठी (६१ लाख) चिंचवडेनगरमध्ये शिवनगरी परिसरातील उर्वरित रस्त्यावर डांबरीकरण (२८ लाख) पिंपळे निलख येथील विशालनगर भागात डांबरीकरणासाठी (३१ लाख ५१ हजार) या कामांचा समावेश आहे. क क्षेत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात प्रभाग क्रमांक ४१ मध्ये ४० लाखांची डांबरीकरणाची कामे करण्यात आली आहेत. तसेच चिंचवड, सांगवी परिसरात अशीच लाखोंची कामे सुरू आहेत.
दरम्यान या कामामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना आणि नागरिकांना त्रास होत आहे. कोणतीही पूर्वकल्पना नसताना डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. (प्रतिनिधी)